लॉकडाऊन काळात व्यवस्थापकांचा घोटाळा उघड; पेट्रोलपंपाचे १० लाख हडपले
औरंगाबाद : लॉकडाऊन कालावधीत पेट्रोल, डिझेल विक्रीतून आलेले १० लाख ६६ हजार रुपये पेट्रोलपंपाच्या दोन व्यवस्थापकांनीच हडपल्याचे समोर आले. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मच्छिंंद्र पोतनीस (रा. नाशिक) आणि हरिश्चंद्र भोसले (रा. माजलगाव), अशी आरोपींची नावे आहेत.  पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, तक्रारदार विक्रम सोळंके ( रा. टिळकनगर) यांचा गारखेडा शिवाजीनगर रस्त्यावर बालाजी पेट्रोल पंप आहे.  आरोपी त्यांच्या पंपावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते दर आठ दिवसांनी पंपावर येऊन हिशेब पाहत असत. लॉकडाऊन कालावधीत ते पुणे येथे होते. या कालावधीत विक्री झालेले पेट्रोल, डिझेलची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे त्यांनी दोन्ही आरोपींना सांगितले होते.

दोन शिफ्टमध्ये काम करीत असलेल्या आरोपींनी एकूण रकमेपैकी काही रक्कम जमा केली, तर उर्वरित रक्कम स्वत:कडे ठेवून घेतली. लॉकडाऊन संपल्यानंतर सोळंके यांनी त्यांच्या लेखापालामार्फत पेट्रोल, डिझेल विक्री व्यवहाराचे आॅडिट केले असता आरोपी व्यवस्थापकांनी सुमारे १० लाख ६६ हजार रुपये हडपल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार सोळंके यांच्या लक्षात आल्याचे समजताच आरोपींनी पैसे देण्याची तयारी दर्शविली. पैसे आणून देतो, असे सांगून ते गायब झाले.  बुधवारी त्यांनी जवाहरनगर ठाणे गाठून आरोपींविरोधात फसवणूक आणि विश्वासघात केल्याची तक्रार नोंदविली.

Post a comment

0 Comments