ऑगस्ट महिन्यातही जिल्हांतर्गत प्रवासासाठी पोलिसांच्या इ-पासची गरज
मुंबई -राज्य सरकारने २९ जुलै रोजी ऑगस्ट महिन्यातील लॉकडाऊन विषयी नियमावली जाहीर केली आहे. काही बाबी ऑगस्ट महिन्यापासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही बाबी यापुढेही बंदच राहणार आहेत. जिल्हांतर्गत वाहतुकीबाबत देखील नियमावलीत सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची वाहतूक सुरु राहणार असून अन्य प्रकारची वाहतूक अत्यावश्यक कारणांसाठीच करू दिली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून दिला जाणारा इ-पास संबंधित प्रवाशाकडे असणे आवश्यक आहे.

एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाण्यासाठी यापूर्वी पोलिसांकडून इ- पास दिले जात होते. तीच प्रक्रिया ऑगस्ट महिन्यातही सुरु ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी इ- पाससाठी तयार केलेल्या संकेतस्थळावरून जाऊन नागरिकांना इ- पास काढता येतात.

त्याचप्रमाणे पुणे पोलिसांनी देखील इ- पाससाठी स्वतःचे संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यामुळे पुणेकरांना त्यावरून देखील इ- पास काढता येऊ शकतो.

महाराष्ट्र पोलिसांनी www.covid19.mhpolice.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. यावरून इ- पाससाठी अर्ज करता येऊ शकतो. यामध्ये आवश्यक माहिती, फोटो, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्यानंतर पाससाठी अर्ज करता येतो.

अर्ज करताना कुठून कुठे जायचे आहे. तसेच प्रवासाचे कारण देखील देणे आवश्यक आहे. पुणे पोलिसांनी www.punepolice.in हे संकेतस्थळ सुरु केले असून याद्वारे देखील पुणेकरांना जिल्हांतर्गत प्रवासासाठी इ- पास मिळणार आहे.

राज्य सरकारने कारमधून चालक आणि तीन प्रवासी अशा चार जणांना, तसेच दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

Post a comment

0 Comments