धक्कादायक ! गजकर्णावर लेप लावताच रुग्ण दगावला; डॉक्टरवर गुन्हा दाखलऔरंगाबाद : गजकर्ण उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी लावलेल्या लेपानंतर रुग्ण दगावल्याची घटना हडको एन-१२ येथे २८ जुलै रोजी घडली. याप्रकरणी सिटिचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. सलीम खान, असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, हडको एन-१२ येथील सुभाष मोरे यांना दोन वर्षांपासून गजकर्णाचा त्रास होता. २७ रोजी सकाळी ११ वाजता मोरे यांना त्यांच्या मुलाने जटवाडा येथील लोकसेवा क्लिनिक येथे नेले. यावेळी डॉ. सलीम यांनी रुग्णाचे छायाचित्र दाखवून मोरे यांच्या गजकर्णावर पूर्णपणे उपचार होईल. त्यासाठी २० हजार रुपये खर्च सांगितला.

रुग्ण बरा झाला नाही, तर फी परत करीन, असे डॉक्टरने सांगितले. यावर विश्वास ठेवून मोरे यांनी उपचाराची तयारी दर्शविली. यावेळी सायंकाळी घरी येऊन उपचार करतो, असे डॉक्टरने  सांगितले. सायंकाळी डॉक्टर मोरे याने त्यांच्या घरी येऊन त्यांच्या संपूर्ण अंगाला त्याने आणलेल्या पावडरचा लेप तयार करून लावला. यानंतर २० हजार रुपये घेऊन डॉक्टर निघून गेला. तासाभराने मोरे यांच्या अंगावर फोड आले आणि त्यांना त्रास होऊ लागला. ही बाब मोरे यांच्या मुलाने डॉक्टरला फोन करून सांगितली असता त्याने त्रास सहन करा, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण शरीराच्या त्वचेची सालटे निघाली आणि रुग्णाला प्रचंड त्रास  सुरू होता.

डॉक्टर सकाळी रुग्णाच्या घरी आला आणि त्याने औषधी दुकानातून तीन गोळ्या त्यांना खाण्यास दिल्या. हा डोस घेतल्यानंतर तासाभराने रुग्ण बेशुद्ध झाला. यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरानी त्यांना तपासून मयत घोषित केले. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक ए.डी. नागरे तपास करीत आहेत. 
 

Post a comment

0 Comments