रशियातील सर्वात मोठी स्टील कंपनी असलेल्या ‘नोव्होलिपेत्सक स्टील’चा (एनएलएमके) ‘ऑरिक’मधील मेगा प्रकल्पाचा मार्ग मोकळा

औरंगाबाद : रशियातील सर्वात मोठी स्टील कंपनी असलेल्या ‘नोव्होलिपेत्सक स्टील’चा (एनएलएमके) ‘ऑरिक’मधील मेगा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कंपनीला औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडमधील (ऑरिक) प्रकल्पासाठी शेंद्र्यात ४३ एकर जमीन मंजूर झाली. मुंबईत ऑरिकअंतर्गत झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. 

‘एनएलएमके’ ही रशियन कंपनी ऑरिकमध्ये दोन टप्प्यांत ५ हजार ८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीने बिडकीन-शेंद्रा येथे प्रकल्प उभारणीसाठी तयारी दर्शवली होती. यासंदर्भात तीन ते चार दिवसापूर्वी कंपनीसोबत सामंजस्य करारही (एमओयू) करण्यात आला. त्यानंतर या कंपनीने जागेसाठीची पाच टक्के टोकन रक्कम भरली, अशी माहिती ऑरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी दिली.

 श्री. काटकर म्हणाले, की जगभरात ट्रान्स्फॉर्मरसाठी लागणारे स्पेशलाईज्ड स्टील ‘एनएलएमके’ तयार करते. जगभरात लागणाऱ्या स्टीलपैकी ६० टक्के उत्पादन ही कंपनी करते. भारतातही ट्रान्स्फॉर्मरसाठी लागणारे विशिष्ट स्टील बाहेरदेशांतून आयात केले जाते. या कंपनीमुळे आयातीवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. या कंपनीने ऑरिकच्या शेंद्रा भागात जमिनीची मागणी केली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जागेची पाहणी केली होती. नंतर जमीन मंजूर करण्यात आली. यासंदर्भात आयोजित बैठकीला ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, दिल्ली येथील संचालक अभिषेक चौधरी व अन्य सदस्य उपस्थित होते, अशी माहितीही श्री. काटकर यांनी दिली.

अशी असेल गुंतवणूक 
ही कंपनी ऑरिकमध्ये ५ हजार ८०० कोटींची दोन टप्प्यांत गुंतवणूक करणार आहे. पहिल्या टप्प्यात ८०० तर दुसऱ्या टप्प्यात पाच हजार कोटी अशी गुंतवणूक राहणार आहे. या कंपनीमुळे नवीन आठ ते दहा व्हेंडर्स तयार होतील. शिवाय ५०० हून अधिक जणांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पामुळे इतर नवीन कंपन्यांच्याही हालचालींना गती येणार आहे, असेही श्री. काटकर यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments