उद्धव ठाकरे सर्वच पातळ्यांवर नापास, हे तर नापासांचे सरकार' - रावसाहेब दानवे

'

औरंगाबाद - राम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरू असून 5 ऑगस्ट रोजी हा समारंभ होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला जाणार की नाही? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासंदर्भात बोलताना भाजप नेते, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवरही दानवेंनी निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे सर्वच पातळ्यांवर नापास झाले आहेत, हे तर नापासांचे सरकार आहे, असे म्हणत दानवेंनी राज्य सरकारला टोला लगावला

रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते औरंगाबाद शहरात शुक्रवारी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झालं. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा पुतळा उभा करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते, असा टोला रावसाहेब दानवेंनी शरद पवारांना लगावला. आता, मी देखील पावसात भाषण केलं, पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार असाही विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच, राज्य सरकारवर टीका करताना, महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग दोन जणांच्या हातात आहे. तर, तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगतोय. या गाडीचं स्टेअरींग दोघांच्या हातात असल्याने गाडी झाडावर आदळणार, असा भाकितही दानवेंनी केलं. त्यासोबतच उद्धव ठाकरे हे सर्वच पातळीवर नापास झाले आहेत, त्यामुळे हे नापासांचं सरकार आहे, असा टोलाही दानवेंनी लगावला. तर, राम मंदिरावरुनही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही तरी, रामभक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का? हवे तर सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांनी अयोध्येला जावं. प्रभू रामासाठी मानपान कसला. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत

दरम्यान, शरद पवार यांच्यावर रावसाहेव दानवेंनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. पावसात भाषण कधी करायचं, हे रावसाहेब दानवेना अजून कळणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Post a comment

0 Comments