रायगड पेन मधील जेएसडब्ल्यू कारखान्यातून धुराचे लोट,नागरिकांना श्र्वसनास ञास परिसरात भीतीचे वातावरणरायगड - डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतून आज सकाळी मोठ्या प्रमाणात धूळमिश्रीत धूर बाहेर पडल्याने, वडखळ पेण परिसरात दाट धूराचे लोळ पसरले होते. साधारण लालसर रंगाच्या धुराचा वास असह्य होत पेणकरांमध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे एकमेकांना सोशल मीडियाद्वारे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत होते.
आज (29 जुलै) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पेण डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूळमिश्रीत धूराचे लोळ बाहेर पडत होते. हे धुराचे लोळ कंपनी परिसरातील वडखळ, पेणपर्यंत पोहोचले. दाट पसरलेल्या धुरामुळे समोरचे दिसेनासे झाले होते. लालसर रंगाचा प्रचंड धूर आणि त्याच्या उग्र वासामुळे डोलवी, गडब, काराव, वडखळ, आमटेम, नवेगाव व परिसरातील शेकडो गावांतील नागरिकांना असह्य झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने वडखळ, पेणमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र नेमके काय झाले? याबाबत काहीही माहिती नसल्याने घबराट अधिकच वाढली. सोशल मीडियाद्वारे एकमेकांना संदेश पाठवून काळजी घेण्याचे आवाहन पेणकरांकडून करण्यात येत होते.
दरम्यान, काळजी करण्याचे काही कारण नसून, जेएसडब्ल्यू कंपनीतील प्लांट शटडाऊन झाल्याने धुळीचे लोळ उठल्याचे सांगतानाच हा विषारी वायू नसल्याचे पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आता परिस्थिती नियंत्रणात असून नेहमीप्रमाणे काम सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments