प्लाझ्मा दान हे रक्तदानच , प्लाझ्मा दात्यांनी उत्स्फूर्तपणे प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे - जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद, दिनांक 27  - कोरोना मुक्त  झालेल्या इच्छुकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. 
आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कारोना परिस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा.इम्तियाज जलील, आ.अंबादास दानवे, आ.संजय शिरसाठ, आ.प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.मिलिंद जोशी व अविनाश मरकड आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी श्री.चौधरी म्हणाले की, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या प्लाझ्मा दात्यांची प्लाझ्मा चाचणी करण्यात येते. ज्यांच्या प्लाझ्मात प्रतिकार शक्ती (ANTIBODYS) योग्य प्रमाणात असतील त्यांचेच प्लाझ्मा रुग्णांना देता येऊ शकते. त्यामुळे प्लाझ्मा चाचणी करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोनमुक्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे यावे. इच्छुकांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय  (घाटी) येथे प्लाझ्मा देण्याची सोय करण्यात आली आहे. प्लाझ्मा दान हे रक्तदानच असते. दान केलेल्या रक्तातून प्लाझ्मा काढला जातो व कोरोनाचा रुग्ण गंभीर होण्यापूर्वी त्यास प्लाझ्मा उपचार दिल्यास रुग्णाचा जीव वाचवता येतो, असे  सांगून   लोकप्रतिनिधीनी आपल्या मतदारसंघात त्यासाठी लोकप्रबोधन करण्याचे आवाहन श्री.चौधरी यांनी केले.       
           तसेच कोरोना संक्रमीत गरीब रुग्णांना महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतून पूर्ण उपचार मिळावे या लोकप्रतिनिधींच्या मागणीवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये गरीब रुग्णांना पूर्ण लाभ देण्याबाबत उपाय योजना करण्यात येत असल्याचे श्री.चौधरी यांनी सांगितले. तसेच घाटी रुग्णालयातील जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या उपचार खर्चाचे प्रस्ताव नामंजूर न करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
यावेळी मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी संचारबंदीच्या काळात अँटिजेन चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यामुळे रुग्णांचे निदान वेळेत झाल्याने कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यास यश आल्याचे सांगितले. केंद्रीय आरोग्य पथकाच्या सुचनेनूसार रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्याच्या दृष्टीने यापुढे संस्थात्मक विलगीकरणापेक्षा तात्काळ अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच यापुढे पॉझिटिव्ह रुग्णांमधील सौम्य लक्षणे असणाऱ्यांना घरीच विलगीकरण करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पॉझीटिव्ह रुग्ण असलेल्या क्षेत्रात पूर्ण परिसर सील करण्याऐवजी केवळ बाधीत रुग्णाच्या घरांजवळच प्रतिबंधित करण्यात आल्याचे बॅनर लावण्यात येईल. ज्यामुळे इतर नागरिकांना सावधही राहता येईल व त्यांचे नियमित काम करण्यास त्यांना अडथळा येणार नाही, असे श्री.पाण्डेय यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्रीय पथकाच्या सुचनेनूसार दिल्ली पॅटर्न प्रमाणे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याचबरोबर जेवढे चाचणीचे प्रमाण वाढेल तेवढे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे मनपा तर्फे जास्तीत जास्त नागरिकांची अँटिजेन चाचण्या करण्याच्या उद्देशाने आणखी दीड लाख अँटिजेजन किट खरेदी करणार असल्याचे सांगितले. तसेच औरंगाबाद मनपा ही सर्वात जास्त कोरोना चाचण्या करणारी महाराष्ट्रात पहिली तर देशात दुसरी मनपा ठरली असल्याचे यावेळी श्री.पाण्डेय यांनी सांगितले. 
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी कोरोना बाधित पोलिसांसाठी स्वतंत्र उपचार सुविधा असल्याचे सांगितले. तसेच शहरात येणाऱ्या प्रत्येकाची अँटिजेन चाचणी करण्यात येत असल्याचे सांगितले.  
  खा.इत्मियाज जलील यांनी महात्मा फुले योजनेतून कोरोना रुग्णांना पूर्ण उपचार देण्यासंबधी सुधारणा करण्याची मागणी केली. यावेळी आ.अंबादास दानवे यांनी सावखेडा येथे सर्व व्यापारी, दुकानदार, संशयीत नागरिकांची चाचणी अधिक प्रमाणात करण्याची त्याचबरोबर ग्रामसेवकांनी गावात थांबणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच प्लाझ्मा दान म्हणजे काय याबाबत जनतेत संभ्रम दुर करण्याची व याबाबत प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. शिवशंकर कॉलनी, मयुरनगर भागात कंन्टेटमेंट झोन पत्रे लावून पूर्णपणे बंद केल्याने इतर नागरिकांना नियमित कामांत अडथळा होत असून उपाययोजना करण्याची मागणी केली. 
आ.संजय शिरसाठ यांनी कोरोना संसर्ग काळात सेवा देणाऱ्या कोरोना योध्दा पोलीस तसेच इतर योध्द्यांसाठी कोरोना लागण झाल्यास किंवा लक्षणे दिसत असल्यास त्यांना त्वरीत योग्य उपचाराच्या सुविधा देण्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. आ.प्रदिप जैस्वाल यांनीही कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले तरी आणखी चाचण्या वाढविण्याचे मत व्यक्त केले. 
****

Post a comment

0 Comments