शिवाजीनगर परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मतृदेह


पुणे - येथील शिवाजीनगर गावठाण परिसरात बंद फ्लॅटमध्ये वृद्ध पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

संभाजी बापू शिंदे (७५) आणि शोभा संभाजी शिंदे (७०) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे चार-पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.

शिंदे दाम्पत्यांना मूलबाळ नाही. त्यामुळे शिवाजीनगर गावठाण परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये दोघेच राहत होते.पुण्यात असणारे त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला यायचे. परंतु, मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे कोणी येऊ शकले नव्हते.

दरम्यान, ते फोन उचलत नसल्यामुळे मयत महिलेच्या बहिणीची मुलगी त्यांना भेटण्यासाठी शनिवारी शिवाजीनगर येथील त्यांच्या फ्लॅटवर आली. परंतु वारंवार दरवाजा ठोठावून ही दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता कुजलेल्या अवस्थेत यांचे मृतदेह दिसले.

शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. या दोघांचा मृत्यू कसा झाला याविषयी अद्याप काहीही माहिती नाही.

याप्रकरणी  शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post a comment

0 Comments