महाविकास आघाडी सरकारचे स्टेअरिंग उध्दव ठाकरे यांच्याच हाती ; पुण्यात दाखवली झलकपुणे - महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेले शिवसेना – राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हातात आहे ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी न बोलता स्वतःच गाडी चालवून या सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात असल्याची झलक पुण्यात दाखवून दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती.एक मुख्यमंत्री मातोश्रीवरून कार्यभार पाहतात, तर दुसरे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत, असा हल्लाबोल केला होता.

तर, काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे तीन चाकी सरकार असले तरी मागे बसलेले लोकच कुठे जायचे ते ठरवतात, अशा शब्दांत महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली होती.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यापासून खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ ते भाजपचे आमदार सर्वच जण आक्रमक झाले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन आपणच मुख्यमंत्री असल्याचे गुरुवारी दाखवून दिले.

मुख्यमंत्र्यांनी चालत्या गाडीतूनच अधिकारी आणि पत्रकारांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे जायला निघाले. त्यावेळी बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांनी प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली.

मात्र, चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी लगेचच स्टिअरिंगवरील दोन्ही हात जोडून नमस्कार केला.

Post a comment

0 Comments