शूsss येत आहेत डोंबिवलीतले झोंबिज....


मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही अटी शर्तींसह मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाला परवानगी आहे. सेटवर निवडक लोकांची उपस्थिती, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करणे हे सेटवरील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. या अटींचे पालन करतच एका नव्या मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

‘झोंबिवली’ असं कॅची नाव असणारा हा मराठीतला पहिला झॉम-कॉम सिनेमा असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. अ‍ॅक्शन, सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.

आदित्य यांनी क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे आदी मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. सारेगम प्रस्तुत आणि Yoodlee Films निर्मित ‘झोंबिवली’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबई येथे पार पडला आणि या सिनेमातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूर येथे होणार आहे.

या सिनेमाचे पहिले-वहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.‘डोंबिवलीमधील झोंबिज’ असे कनेक्शन असल्यामुळे सिनेमाचे नाव ‘झोंबिवली’ असे आहे.

या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांच्या मते ‘झोंबिवली’ हा सिनेमा तरुण पिढीला लक्षात ठेवून बनवला आहे. त्याचबरोबर हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण प्रेक्षकांना या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे.

लॉरेन्स डिकुन्हा हे सिनेमाचे डिओपी आहेत तर साईनाथ गणुवाड, सिध्देश पूरकर, महेश अय्यर आणि योगेश जोशी हे लेखक आहेत. एव्ही प्रफुल्ल चंद्रा यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे.

जरी सिनेमाचा नवीन विषय, कलाकारांच्या नवीन जोड्या असल्या तरी डोंबिवलीमध्ये घडणारी ही ‘झोंबिवली’ची कथा काय आहे याचे उत्तर पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये प्रेक्षकांना मिळेल.

Post a comment

0 Comments