दिलासादायक ! औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीला सुरुवातकोरोना रुग्णाच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने जागवली नवीन उमेद
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात अखेर प्लाझ्मा थेरपीला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या ४२ वर्षीय गंभीर रुग्णाला गुरुवारी दुपारी प्लाझ्मा देण्यात आला. २४ तासांनी दुसऱ्यांदा प्लाझ्मा देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

कोरोना रुग्णाच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. त्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा गंभीर रुग्णांना देण्यात येतात. त्यासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा संकलीत केले जात आहेत. घाटीत किमान ५० लिटर प्लाझ्मा संकलनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कोरोनातून बरे झालेल्या एका रुग्णाकडून एका वेळी ४०० मिलिलिटर प्लाझ्मा संकलन करता येते. यानुसार १२५ दात्यांकडून याचे संकलन केले जाणार आहे. त्यासाठी १३६ दात्यांबरोबर घाटीने संपर्क केला. 

२४ तासाच्या अंतराने दोन डोस 
गंभीर रुग्णांना २०० मिलिलिटर कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचे २४ तासांच्या अंतरात दोन डोस दिले जातील. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मामध्ये कोरोना विषाणूविरूद्ध अँटिबॉडी असतात. ज्यामुळे संक्रमणाविरूद्ध प्लाझ्मा मिळालेल्या गंभीर रुग्णांना आजाराशी लढण्यास मदत होते.  या थेरपीसाठी आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर अखेर गुरुवारी रुग्णांना प्लाझ्मा देण्यास सुरुवात झाली आहे.

Post a comment

0 Comments