स्पर्धा परीक्षेत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी’ - आय.ए.एस. अधिकारी राहुल चव्हाण


पंढरपूर: युपीएससी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावचे नाव भारताच्या नकाशात अधिक ठळकपणे कोरलेले नूतन  आय.ए. एस. अधिकारी राहुल चव्हाण यांनी स्वेरीला सदिच्छा भेट दिली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालून आणि यशस्वी होऊन विद्यार्थ्यांना  एक नवप्रेरणा देणारे कार्य केल्याबद्धल नूतन आय. ए. एस. अधिकारी राहुल चव्हाण यांचा सत्कार संस्थेचे स्वेरीचे अध्यक्ष नामदेव कागदे यांच्या हस्ते करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना आय.ए.एस. राहुल चव्हाण म्हणाले की ‘माझे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे जवळच असलेल्या निकम वस्तीवर झाले. पुढे सातवीपर्यंतचे शिक्षण हे माझ्या खर्डी गावातच झाले. गोपाळपूर येथे स्वेरीचे तंत्रशिक्षण संकुल उभारून नवीन शैक्षणिक क्रांती केल्यामुळे  डॉ. बी.पी.रोंगे सर हे लहानपणापासूनच माझे आदर्श होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्याने पुढील  शिक्षण हे कवठेकर शाळेत पूर्ण केले. अत्यंत कठोर परिश्रम आणि जिद्द बाळगल्यामुळे दहावीला ९५ टक्के तर बारावीला ७५ टक्के गुण मिळाले. स्पर्धा परीक्षेचा तिसरा प्रयत्न ज्यावेळेस सुरू होता त्यावेळी मला डेंग्यु आजार झाला होता. अंगात प्रचंड ताप देखील होता. लक्ष विचलित होत होते पण मी एकाग्रता ढळू दिली नाही. अखेर या परीक्षेचा निकाल ४ तारखेला लागला आणि भारतात १०९ व्या रँकने यशस्वी झालो. परीक्षा झाली, यशस्वीही झालो आता खऱ्या अर्थाने पुढील आव्हाने येथून सुरू होणार आहेत. मी यशामुळे जरी आनंदी असलो तरी समाजासाठी मला आणखी चांगले कार्य करायचे आहे.’ स्वेरीचे माजी संस्थापक अध्यक्ष डॉ.अरुण गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, कल्याण चव्हाण, समाधान गाजरे, स्वेरीचे विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, डॉ. स्नेहा रोंगे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments