खा. शरद पवार यांच्या हस्ते प्लाझ्मादान शिबिराचे उद्घाटन, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रममुबई - लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आरोग्योत्सव आणि प्लाझ्मादान शिबिराचा उपक्रम राबवला. तो आपल्या सर्वांसाठीच अभिमानास्पद असून मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा श्रींची प्रतिष्ठापना न करता लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधत आरोग्योत्सव व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनानंतर पवार  बोलत होते.

आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि जिथे, जिथे मराठी माणूस पोहोचलाय त्याठिकाणी म्हणजेच देशभरात आणि परदेशातही गणेशोत्सव पोहोचलाय. देशात आणि देशाबाहेर अनेक गणेशोत्सव मंडळे आहेत, पण, यात आगळेवेगळे काम करणारी मंडळे पाहण्याची स्पर्धा घेतली तर यात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथम क्रमांक पटकाविल असा आपल्याला विश्वास असल्याचे पवार साहेब म्हणाले. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असल्याप्रमाणे काम करण्याची भूमिका या मंडळाने घेतली आहे. प्लाझ्मा देण्यासाठी आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी जो पुढाकार घेतो, अशांना संघिटत करण्यासाठी आजचा हा सोहळा असल्याचे सांगत पवार यांनी मंडळाची प्रशंसा केली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्लाझ्मादान, रक्तदान, विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत, दुष्काळग्रस्तांना मदत असे अनेक उपक्रम गेली अनेक वर्ष राबवत याकडेही त्यांनी लक्ष वेधले

त्याग आणि शौर्य दाखवणाऱ्या शहीद जवानांचा आपण गौरव करत आहात, एका अर्थाने हा संपूर्ण देशाचाच गौरव असल्याचे ते म्हणाले. 
मुंबई पोलिस हा आपल्या कुटुंबाचाच एक घटक झाल्याचे सांगताना पवार म्हणाले, एकदा माझी गाडी सिग्नलला थांबलेली असताना एक मुलगा रस्ता ओलांडताना मी पाहिला. त्यावेळी तो मुलगा पोलिसांना म्हणाला, पोलिसकाका मला जरा जाऊद्या. एक ९ ते १० वर्षांचा मुलगाही पोलिसांना काका म्हणतो. याचाच अर्थ पोलीस हा त्याच्या कुटुंबाचा एक घटक झाला आहे, हे मुंबई पोलिसांचे वैशिष्ट्य असल्याचे पवार म्हणाले. पोलिसांना आपल्या कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. प्रत्येकाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या शहीद मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान आपण करत आहात, प्रत्येक मुंबईकराला, भारतीयाला मुंबई पोलिसांचा अभिमान आहे. मुंबई पोलिसांमध्ये ज्यांनी आपले सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला, त्यांचा आपण याठिकाणी सन्मान करत आहात ही अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे पवार  म्हणाले.  
आज कोरोनाचे संकट जगावर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही असेच संकट आले होते. त्यावेळी स्वातंत्र्यासंदर्भात पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पुण्याला ठरले होते. पण, प्लेगच्या साथीमुळे हे अधिवेशन मुंबईतील गवालिया टँक याठिकाणी हलवण्यात आले. त्यामुळे आपण याठिकाणाला ऑगस्ट क्रांती मैदान असे संबोधतो. तेव्हापासून ही चळवळ सुरू झाली. त्यात महाराष्ट्राचे आणि मुंबईचे एक स्थान आहे. त्यामुळे आपण याठिकाणी सर्व गोष्टींचे स्मरण करण्याची भूमिका घेत आहात याचा मला आनंद असल्याचे पवार यांनी सांगितले. 
लालबागचा राजा हा प्रत्येक सर्वसामान्याच्या अंतकरणात पोहोचलेला आहे. तो केवळ मुंबईपुरताच सीमित नाही. लालबागचा राजा सा. गणेशोत्सव मंडळ हे देशापलीकडेही पोहचले आहे. परदेशातला मराठी माणूसही कधी मुंबईत आला तर लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याशिवाय राहात नाही. हा एक प्रचंड विश्वास लाबागच्या राजाने दिला. आज या मंडळाने जो उपक्रम राबवलाय तो आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे. या मंडळाने जी नवी दिशा दाखवली त्याचे अवलोकन अनेक मंडळे करतील असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला. अनेकांचे प्राण वाचवण्याबाबतचा हा उपक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून लालबागचा राजा या मंडळाने राबवला, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करत असल्याचेही पवार साहेब यावेळी म्हणाले.
यावेळी महाराष्ट्रातील ९२ शहीद पोलिस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्याच्या कामाला मंडळाने आजपासून सुरूवात केली. त्याचबरोबर सीमाभागात लढताना वीरगती मिळालेले जवान सचिन मोरे यांच्या कुटुंबियांना आज दोन लाख रुपयांचा सन्मानधनादेश सुपूर्द करण्यात आला.

कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर, खा. अरविंद सावंत, आ. अजय चौधरी,  माजी आ. दगडू सकपाळ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी, नगरसेवक अनिल कोकीळ, शहीद जवान सचिन मोरे आणि सुनिल काळे यांचे कुटुंबिय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments