पैसे मागणाऱ्या अधिष्ठाताविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल
औरंगाबाद : पीएच.डी.चा व्हायवा घेण्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने  बेगमपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठाकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले. 

 डॉ. अमृतकर यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विद्यापीठ बचाव कृती समितीच्या शिष्ठमंडळाने मंगळवारी पुन्हा कुलगुरूंची भेट घेतली. विद्यापीठाची  बदनामी होत असल्यामुळे अधिष्ठातांवर  पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी केली. कृती समितीची मागणी आणि विद्यार्थी संघटनांच्या आग्रहामुळे कुलगुरूंनी अधिष्ठातांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश दिल्याचे कृती समिती समन्वयक डॉ. राजेश करपे यांनी सांगितले.

विद्यापीठातील संवैधानिक पदावरील सर्व नियुक्त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी सेवानिवृत न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचे डॉ. शंकर अंभोरे यांनी सांगितले. डॉ. फुलचंद सलामपुरे,  डॉ. विलास खंदारे, सुनील मगरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. गोपाल बच्छिरे, डॉ. भास्कर टेकाळे, दादासाहेब गजहंस, प्रा. बंडू सोमवंशी, डॉ. एस. बी. वाघमारे,         डॉ. अनिल पांडे, दीपक साळुंके, शिवराम म्हस्के, डॉ. गंगाधर मोरे, रमाकांत छडीदार आदी यावेळी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments