औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वाधिक ताण असणाऱ्या शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालयाच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. रुग्णालयास लागणारे मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, निधी व इतर पायाभूत सुविधांसाठी तातडीने पाठपुरावा केला जाईल. तसेच महत्वाचे प्रलंबित प्रस्तावही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी यांनी आज शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या बैठक हॉलमध्ये शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महाविदयालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, महापालिकेच्या वैदयकीय अधिकारी, डॉ. नीता पाडळकर, डॉ. मिनाक्षी भटटाचार्य, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे अधिकारी डॉ. सुधीर चौधरी, वैदयकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सुचेता जोशी, डॉ. विकास राठोड, डॉ. ज्योती बजाज आदी उपस्थित होते.
कारोना संसर्गाच्या सध्याच्या काळात घाटी रुग्णालय अतिशय चांगले काम करीत आहे, असे कौतुक करुन जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी यापुढेही सर्वांनी जबाबदारी व दक्षतेने काम करणे आवश्यक आहे. रुग्णालयाला भेडसावणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या मी प्राधान्याने सोडवेल. विशेषत: रिक्त जागा, रुग्णालयाला लागणारी उपचाराची यंत्रसामुग्री यासोबत बांधकामविषयक बाबी, पाणीपुरवठा, टेलीमेडसीनची सुविधा, प्रयोगशाळेसाठी लागणारी साधने, औषधांचा पुरेसा साठा याबाबतच्या अडचणी सोडवण्यावर भर दिला जाईल.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सुपरस्पेशालीटी रुग्णालयाच्या समस्याही सोडवल्या जातील. या ठिकाणी एमआरआय मशिन तात्काळ बसविले जाईल. तसेच या रुग्णालयाला स्वतंत्र पाणी पुरवठयाच्या लाईनव्दारे पाणी उपलब्ध करुन दिले जाईल. रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरीता 10 केएल ऑक्सिजन टँकची उभारणी करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. विभागनिहाय महत्त्वाचे प्रलंबित कामांचे प्रस्ताव माझ्याकडे तातडीने सादर करावेत, असे निर्देश देऊन रुग्णालयाचे सर्वच डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांनी सध्याच्या कोरोनाच्या काळात टीमवर्कने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी डॉ. कानन येळीकर यांनी शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालयाचे संपूर्ण कामकाज तसेच सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना देत असलेल्या उपचाराच्या सुविधा व सदयस्थिती आणि समस्या यांची सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. डॉ. सुधीर चौधरी यांनी सुपर स्पेशालीटी रुग्णालयाबाबत तर डॉ. ज्योती बजाज यांनी प्रयोगशाळेच्या एकूण कामकाजाबाबत माहित दिली.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी शासकीय वैदयकीय महाविदयालयातील प्रयोगशाळा आणि सुपर स्पेशालीटी रुग्णालयाची पहाणी केली. यावेळी तेथील सुविधा व अडचणी यांची माहिती संबंधित वैदयकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली.
0 Comments