पतंजलीच्या वितरकाला व्यवस्थापकानेच ३४ लाखांना गंडविले


औरंगाबाद : पतंजली उत्पादनाच्या वितरकाचा विश्वासघात करीत  व्यवस्थापकाने तब्बल ३४ लाख ६४ हजार ७२६ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यवस्थापक नरेंद्र नवपुते आणि साई नरेंद्र नवपुते, अशी आरोपींची नावे आहेत. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मंजूषा शुक्ल या पतंजली उत्पादनाच्या विभागीय वितरक आहेत.  गारखेड्यातील छत्रपतीनगरात २०१४ पासून त्यांचे पती हा  व्यवसाय सांभाळत. आरोपी नरेंद्र  सुरुवातीपासून त्यांच्याकडे व्यवस्थापक होता. नरेंद्रचा मुलगा साई याने चिकलठाणा येथे पतंजली आरोग्य केंद्र सुरू केले होते. मुलाच्या व्यवसायासाठी लागणारा माल नरेंद्र  तक्रारदारांच्या एजन्सीमधून घेऊन जात असे. पतीच्या निधनानंतर १९ सप्टेंबर २०१७ तेव्हापासून तक्रारदार या व्यवसाय पाहू  लागल्या. आरोपीने मुलाच्या व्यवसायासाठी तब्बल ३४ लाख ६४ हजार ७२६ रुपयांचा माल नेला. हा माल विक्री केल्यावर त्यांनी वितरक कार्यालयात रक्कम जमा केली नाही. 

ही बाब तक्रारदारांच्या निदर्शनास आली.  आरोपींमुळे त्या पतंजली कंपनीला ३४ लाख ६४ हजार ७२६ रुपये जमा करू शकल्या नाहीत. परिणामी, कंपनीने त्यांना ५ लाख ८६ हजार ९३ रुपये व्याज आकारल्याने तक्रारदारांची कंपनीकडे पत खराब झाली. कालांतराने आरोपी नरेंद्रने नोकरी सोडली. आरोपी नवपुते पिता-पुत्र यांनी विश्वासघात करून  ३४ लाख ६४ हजार ७२६ रुपयांची फसवणूक  केल्याची तक्रार पुंडलिकनगर ठाण्यात नोंदविली. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास खटके तपास करीत आहेत. 

Post a comment

0 Comments