कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गणेशोत्सवात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी उदय चौधरी


औरंगाबाद, दिनांक 10  : गणेशोत्सव काळात नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. गणेश मूर्ती काही दिवस अगोदरच नागरिकांनी खरेदी करावी परिणामी गर्दी टाळता आल्यास कोरोनाच्या संसर्गास अटकाव करण्यास मदत होईल. तरी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनास सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत श्री. चौधरी बोलत होते. यावेळी खासदार  इम्तियाज जलिल, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.  
डॉ. कराड यांनी कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही, असे मत मांडले. 
खासदार जलील यांनी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट काही अटी शर्तींसह सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी,  अशी मागणी केली. 
आमदार बागडे यांनी नागरिकांमध्ये कटाक्षाने मास्क वापरणे, शारिरिक अंतर बाळगणे याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे सांगतानाच गणेशमूर्तींच्या स्टॉलला लवकर परवानगी द्यावी. तसेच नागरिकांनी लवकर मूर्ती खरेदी कराव्यात,  जेणेकरून शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळता येईल, यासाठी प्रशासनाने आवाहन करावे, असे सूचविले. 
आमदार अतुल सावे यांनी विदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या घरातच क्वारंटाइन करण्याची मुभा असावी, असे मत मांडले. 
 आमदार प्रदीप जयस्वाल म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नाही. त्यास सर्व लोकप्रतिनिधींनी पसंती दिली.
 आमदार अंबादास दानवे यांनी  ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. पण कोरोना नियंत्रणात आहे, असे सांगितले.  सिल्लोड आणि गंगापूर तालुक्यात मृत्यू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत,  असेच प्रयत्न इतर तालुक्यांतही होणे गरजेचे असल्याचे श्री. दानवे म्हणाले.
  जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी जिल्ह्यातील विविध उपाययोजना, रुग्णांचा शोध, प्रतिबंधात्मक उपाययोजना आदी बाबींची सविस्तर माहिती लोकप्रतिनिधींना दिली. गणेशोत्सव काळात गणेशमूर्तींची विक्री शहरातील टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी, जिल्हा परिषद मैदान येथे होते. या ठिकाणांत अधिकाधिक वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार आहे, असेही ते म्हणाले. औरंगाबाद शहरात व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांची देखील चाचणी करण्यात येईल. शिवाय ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा तत्काळ शोध घेणे, त्यांवर लागलीच उपचार सुरू करणे या दृष्टीने ग्रामसुरक्षा दलाची मदत घेण्यात येईल.  जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था उत्तम, शीघ्र व्हावी, रुग्णांवर वेळेत उपचार सुरू व्हावेत, यादृष्टीने प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यावर नियंत्रणासाठी तालुकानिहाय स्वतंत्ररित्या उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर औरंगाबाद शहरात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी अधिकाधिक चाचणी करण्यावर भर देण्यात येत आहे. अभ्यासिका, कोचिंग क्लासेस, रेस्टॉरंट, खानावळी, हॉटेल्स यांबाबत शासनाच्या निर्देशानुसार प्रशासन अंमलबजावणी करत आहे. तसेच लोकप्रतिनिधींची मते, सूचनादेखील शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत, असेही श्री. चौधरी म्हणाले. 
मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी औरंगाबादकरांनी मुंबई, ठाणेकरांप्रमाणेच स्वयंशिस्तीचे पालन करून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. मनपाच्या एमएचएमएच ॲपमुळे रुग्ण शोधणे, त्यांवर उपचार करणे सोयीचे झालेले आहे. या ॲपमध्येच आता प्लाज्मा दान करणाऱ्या व्यक्तींना नोंदणी करणे शक्य होणार आहे. या ॲपच्या साहाय्याने कोरोना चाचणीचा अहवालही ताबडतोब कळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. शहरात 80 टक्के रुग्णांना आता गृह विलगीकरणाची सुविधा देण्यात येत आहे. परंतु ज्यांच्याकडे सुविधा नाहीत अशा रूग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. शहरातील कोरोना सध्या नियंत्रणात आहे, तो अधिक नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे श्री. पांडेय म्हणाले.
पोलिस आयुक्त श्री. प्रसाद यांनी दहीहंडी उत्सव आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस बंदोबस्त, कोरोनाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली.   
******

Post a comment

0 Comments