दरोडेखोर सध्या काय करताहेत औरंगाबाद पोलिसांनी सुरू केला शोध
औरंगाबाद : २००६ पासून आजपर्यंत दरोड्याचा गुन्हा नोंद असलेले शहरातील तब्बल १२५ आरोपी सध्या काय करीत आहेत, याची माहिती क्रांतीचौक पोलीस जमा करीत आहेत. प्रत्येक हवालदार आणि अधिकाऱ्यांनी पाच ते सहा दरोडेखोरांची माहिती जमा करण्याचे लक्ष्य ठरले आहे. 

शहरातील सर्वाधिक महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणून क्रांतीचौक ठाण्याकडे पाहिले जाते. अनुभवी पोलीस अधिकारी या ठाण्याचा प्रमुख असतो. क्रांतीचौक, मध्यवर्ती बसस्थानक, महावीर चौक आणि पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरा आणि जुना मोंढा असा महत्त्वाचा एरिया या ठाण्याच्या हद्दीत येतो.  

या ठाण्यात  दरमहा दाखल होणाऱ्या गुह्यांची संख्या १०० हून अधिक आहे. नागरी वसाहतीसोबत बाजारपेठ, सामाजिक आणि राजकीय चळवळीचे केंद्र ही याच ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे ठाणेदाराला २४ तास सतर्क राहावे लागते. गुन्हे होऊ नये याकरिता प्रभारी पोलीस अधिकाऱ्याला सतत संशयित लोकांवर आणि रेकॉर्डवरील  गुन्हेगारांवर नजर ठेवावी लागते. याअंतर्गत क्रांतीचौक ठाण्यात २००६ पासून आजपर्यंत दरोड्याचे गुन्हे नोंद असलेल्या १२५ गुन्हेगारांची कुंडली गोळा करणे सुरू केले. ठाण्यातील हवालदार आणि पोलीस अधिकारी यांना प्रत्येकी ५ ते ६ दरोडेखोरांची नावे देण्यात आली. या दरोडेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यातील काही संशयित दरोडेखोरांनी त्यांचा राहण्याचा पत्ता बदलला असण्याची शक्यता आहे. शहरात दरोड्याची घटना घडल्यास रेकॉर्डवरील आरोपीपर्यंत सहज पोहोचता यावे याकरिता त्यांची माहिती जमा केली जात आहे
आरोपींना ठाण्यात बोलावून ते सध्या काय करतात, त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत किती गुन्हे नोंद आहेत. यापैकी किती  खटल्यात त्याला शिक्षा झाली आणि किती केसमध्ये तो निर्दोष सुटला, किती दिवस जेलमध्ये होते याबाबतची माहिती जमा करण्यात येत आहे

Post a comment

0 Comments