समृद्धी महामार्गाला भेगा पावसाने पाडले पितळ उघड


वैजापूर : वैजापूर तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत आहेत. महामार्ग उंच करण्यासाठी कंत्राटदाराने वापरलेली माती व मुरूम पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. याकडे सरकार व संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने महामार्गाच्या कामाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मागील सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून २०१८-१९ दरम्यान या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. महामार्गाचे काम काही खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना संसर्ग आणि पावसाळ्यामुळे या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी पूल, काँक्रिटीकरण, तर कोठे मातीचा भराव टाकण्याचे काम केले जात आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव, बोरदहेगाव, सटाणा, अगरसायगाव, डवाळा, खंबाळा, सुराळा आदी गावांतून हा महामार्ग गेला असून, त्यासाठी एल अँड टी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.

बोरदहेगाव शिवारातील जुने पालखेड, दहेगाव व सटाणा या गावांजवळ कंत्राटदाराने माती व मुरमाचा भराव टाकून महामार्गाची उंची सुमारे ६ मीटरपर्यंत वाढवली आहे. त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करून येथील काम पूर्णदेखील झाले आहे. मात्र, आता ज्या ठिकाणी पुलाचे काम करण्यात आले आहे त्या पुलाखालील माती आणि मुरमाचा भराव पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या असून, समृद्धी महामार्गावरील या जागेवर मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेकडे एल अँड टी कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. शिवाय समृद्धी महामार्गाच्या कामावर लक्ष देण्यासाठी असलेले अधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामासाठी नेमलेल्या कंपन्यांमध्ये काम पूर्ण करण्यासाठी स्पर्धाच सुरू असल्याचे समजते. 

सध्या पावसाळा सुरू असून, पावसाचे पाणी समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावरून वाहत्या रस्त्याखाली उतरत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडण्यास सुरुवात झाली आहे. कंत्राटदाराने महामार्ग उंच करण्यासाठी वारलेली माती व मुरूम वाहून जात असल्याने कामाची गुणवत्ता लक्षात येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महामार्ग खचून जाऊ नये याकरिता रस्त्याच्या खाली दोन्ही बाजंूनी दगडाचे संरक्षक पिचिंग करणे गरजेचे होते.

Post a comment

0 Comments