शाळेत प्रवेश एका नावाने तर दाखला दुसऱ्याच नावाने ढोरकीन येथील आर्यनंदी ग्लोबल स्कुल मधील प्रकार पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील आर्यनंदी ग्लोबल स्कुल या नावाने कार्यरत असलेल्या शाळेचा अजब प्रकार समोर आला असून शाळेत प्रवेश करताना आर्यनंदी ग्लोबल स्कुल च्या नावाने दिला जातो तर शाळा सोडल्यानंतर दाखला दुसऱ्याच नावाने देत पालकांची दिशाभूल करुन फसवणूक केली जात असल्याची ओरड पालक वर्गातून केली जात असून याप्रकरणाची तातडीने चौकशी करून शाळेवर कारवाई करावी अशी मागणी अ.भा.छावा संघटनेच्या वतीने गट शिक्षणाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली.

ढोरकीन येथे आर्यनंदी ग्लोबल स्कुल नावाने प्राथमिक शाळा कार्यरत असून ढोरकीन सह आजु बाजुच्या अनेक खेडेगावातील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.शाळेत प्रवेश देताना शाळा संबंधित संपूर्ण माहिती पालकांना देणे बंधनकारक असतानाही शाळा प्रशासनाने बरीचशी माहिती पालकांपासून दडवित असल्याचे लक्षात येते. चौथी इयत्तेपर्यत असलेल्या या शाळेतून चौथीनंतर व बदली अभावी तथा पुढील शिक्षणासाठी शाळेचा दाखला देताना इतर (औरंगाबाद येथील शिताई प्राईड इंग्लिश स्कूल) या नावाने विद्यार्थ्यांना हाती दिला जातो.

पालकांनी आपल्या पाल्यांचा शाळेत दाखला करताना आर्यनंदी ग्लोबल स्कुल या नावाने ओळख स्विकारुन व विश्वास ठेवून मुलांना शाळेत दाखल केलेले असते. परंतु शाळा सोडताना मात्र औरंगाबाद येथील कुठल्यातरी शाळेचा दाखला देऊन पालकांचा हिरमोड केला जात आहे. शाळेची फिस किंवा डोनेशन स्विकारताना मात्र हि शाळा स्वत:च्या नावाने स्विकारत असल्याने दाखला काढेपर्यंत पालकांना शाळेचा हा खोटेपणा लक्षात येत नाही. महत्त्वाचे हे की औरंगाबाद येथील शिताई प्राईड इंग्लिश स्कूल या नावाने शाळा अस्तित्वात आहे किंवा नाही याबाबतही पालकांना माहिती नाही. पालकांनी विचारपूस केली असता संबंधित शाळेचे संस्थाचालक व शिक्षक उडवाउडवीची उत्तरे देवून आमदार खासदारांची नावे सांगत भीती दाखवत आहेत. तरी याप्रकरणी वरीष्ठ पातळीवर दखल घेऊन येत्या आठ दिवसांत तात्काळ चौकशी करून पाल्यांना ज्या नावाने शाळेत प्रवेश दिला जातो त्या नावाने शाळा सोडल्याचा दाखला देण्याचे आदेश द्यावे. तसेच शाळेची चौकशी करून शाळा बोगस असल्यास रितसर कारवाई करावी व पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी शालेय प्रशासनावर गुन्हा दाखल करुन पालकांना न्याय द्यावा नसता संघटनेच्या वतीने पालकांना सोबत घेऊन कोवीड १९ चे नियम पाळून शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मुळे, तालुकाध्यक्ष किशोर सदावर्ते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a comment

0 Comments