धक्कादायक | सांभाळणे होत नाही म्हणून नव्वद वर्षीय वृध्येला जंगलात फेकले


औरंगाबाद : सांभाळणे होत नाही म्हणून नव्वद वर्षीय मावस सासूला एका कुटुंबाने तिला औरंगाबादजवळील पीरवाडीच्या जंगलातील नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना ३ ऑगस्ट रोजी चिकलठाणा पोलिसांनी उघडकीस आणली. चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी वृद्धेच्या नातेवाइकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्या वृद्धेवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहराजवळ असलेल्या कच्ची घाटी ते पीरवाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलातील नाल्यात एक वृद्ध महिला पडल्याची माहिती ३ ऑगस्ट रोजी चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी वृद्धा नाल्यात बेशुद्धावस्थेत पडलेली दिसून आले. सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी कर्मचाऱ्याच्या मदतीने तिला नाल्यातून बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु, मुकी असल्याने तिला काहीही सांगता येत नव्हते. पोलिसांनी तिच्या कुटुंबाचा शोध सुरू केला.

पोलिसांनी तिचा फोटो आजूबाजूच्या गावांत पाठवून माहिती घेतली. ही वृद्ध महिला नारेगाव, ब्रिजवाडी येथील असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाइकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. वृद्धेला जवळचे कुणीही नातेवाईक नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मावस सून तिचा सांभाळ करत होती. लॉकडाऊनपर्यंत वृद्धा स्वतः भीक मागून पोट भरत होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये तिला जेवण मिळेनासे झाले. त्यानंतर तिला नातेवाइक सांभाळत होते. सांभाळण्याचा कंटाळा आल्याने टाकून दिल्याचे नातेवाईकांकडून कळाले.

Post a comment

0 Comments