चारित्र्यावर शंका घेऊन सततची मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेत संपवली जीवनयात्रा


 औरंगाबाद
चारित्र्यावर शंका घेऊन सततची मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने आपल्या गतिमंद आणि अपंग मुलासमोर घराच्या छताला ओढणीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. कविता साठे असे मृत महिलेचे नाव आहे. मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली असून, या प्रकरणी अमोल साठेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन घरी आलेल्या अमोल साठेने चार ऑगस्ट रोजी रात्री ११.३०च्या सुमारास पत्नी कविताच्या चारित्र्यावर शंका घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण पाहून कविताचा मुलगा आयान याने आपले मामा योव्हान सुखदेव श्रीसुंदर (वय २२, रा. राजनगर, मुकुंदवाडी) यांना बोलावून घेतले. या ठिकाणी कवितेला मारहाण करणाऱ्या अमोलला सुखदेव यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो समजण्यास तयार नव्हता. अमोलने कविता ही गोकुळ बावस्कर याच्या घरी झोपायला का गेली, असे विचारले. घराच्या पत्र्यातून पाणी गळत होते. त्यामुळे मी बावस्करच्या घरी झोपायला गेले, असे कविताने सांगितले. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून सुखदेव हे घरमालकाला बोलविण्यासाठी गेले. या दरम्यान कविता घराच्या एका खोलीत गेली. तिने आतून कडी लावून घेतली. अमोल दरवाजा उघडण्यासाठी आवाज देत होता. सुखदेव, अमोल आणि अन्य लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला नाही. या खोलीत कविताचा गतिमंद व अपंग मुलगा गणेश होता. त्याने आतून दरवाज्याची कडी उघडली. दरवाजा उघडल्यानंतर पंख्याला ओढणीच्या सहाय्याने कविताने गळफास घेतल्याचे दिसले. कविताला खाली उतरवून अमोलच्या चार चाकी वाहनातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. खासगी रुग्णालयाने घाटीत नेण्यास सांगितले. घाटीत उपचार सुरू असताना कविताचा मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments