सिल्लोड तालुक्यातील मोढा शिवारात मृत अवस्थेत हरिण आढळून खळबळ
सिल्लोड -  तालुक्यातील मोढा शिवारात शुक्रवारी दुपारी 5 वाजेच्या सुमारास शेतकऱ्याला मृत अवस्थेत हरिण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान हरणीचा बिबटयाने फडशा पाडल्याची चर्चा परिरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती देऊन रात्री उशीरा पर्यंत वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले नव्हते असे कळते.

        वांगी बु. येथील कैलास माधवराव काकडे यांची मोढा शिवारात गट नं. 505 मध्ये शेती आहे. शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना मृत अवस्थेत हरिण आढळून आली. त्यांनी ही माहिती तत्काळ वांगी व मोढा येथील पोलिस पाटील यांना दिली. पोलिस पाटील यांनी वनरक्षक मनगटे यांना कळवले. त्यांनी दोन वन मजुरांना पाठवले. परंतु सर्वत्र चिखल असल्याने वन मजूर गावातूनच माघारी परतले. 

      दरम्यान हरणीचा बिबटयाने फडशा पडल्याची चर्चा परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या शिवारात एका शेतकऱ्याने सकाळी बिबटया पाहिला अशी ही चर्चा असून त्या शेतकऱ्याचे नाव सांगण्यात मात्र गावकरी नकार देत आहे. वन विभागाच्या पाहणीनंतरच हरणीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असले तरी सध्या मात्र बिबटया आढळल्याच्या चर्चेला उधान आले आहे. या संदर्भात वनरक्षक मनगटे यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळी जात असल्याचे सांगितले.

Post a comment

0 Comments