महापालिकेला आणखी ५० हजार कीट मिळाल्या;पुन्हा अँटिजन टेस्ट सुरूऔरंगाबाद : कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून अत्याधुनिक अँटिजन कीटचा वापर करण्यात येत आहे. तीन दिवसांपासून कीट संपल्यामुळे लाळेचे नमुने घेण्यात येत होते. तातडीने नवीन ५० हजार कीट मागविण्यात आल्या. मंगळवारी रात्री उशिरा या कीट महापालिकेला मिळाल्या. बुधवारपासून पुन्हा तपासणी सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली.

आरटीपीसीआर चाचण्यांसाठी लागणारा विलंब विचारात घेता महापालिकेने महिनाभरापासून रॅपीड पद्धतीच्या अँटिजन चाचण्याही सुरू केल्या आहेत. सुरुवातीला राज्य सरकारकडून २० हजार अँटिजन टेस्ट कीट प्राप्त झाल्या. त्यापाठोपाठ मनपाने दिल्ली येथून दोन टप्प्यांत एक लाख अँटिजन टेस्ट कीट खरेदी केल्या. १० जुलैपासून शहरातील नागरिकांच्या अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आल्या. कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींसाठी आरटीपीसीआर टेस्टदेखील केल्या जात आहेत.

शहरातील एन्ट्री पॉइंट, मोबाईल पथकद्वारे आणि व्यापारी विक्रेते यांची अँटिजन टेस्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. याचदरम्यान, महापालिकेने सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यांना काही अँटिजन टेस्ट उपलब्ध करून दिल्या होत्या. दरम्यानच्या काळात अँटिजन टेस्ट कीट खरेदीसाठी मनपाने दिल्लीच्या एजन्सीला आणखी पन्नास हजार कीटची आॅर्डर दिली; परंतु दिल्लीच्या एजन्सीकडून अँटिजन टेस्ट कीट पाठविण्यास विलंब झाला. मंगळवारी सायंकाळी ५० हजार अँटिजन टेस्ट कीट महापालिकेला प्राप्त झाल्या. त्यामुळे आता बुधवारपासून अँटिजन टेस्ट करण्याची मोहीम राबवली जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments