चक्क जेसीबीच्या साहाय्याने काढले पाझर तलावातील पाणी,ठेकेदाराचा अजब प्रकारवैजापूर (प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


नागपूर-मुंबई अंतर कमीत-कमी वेळेत कापता यावे या स्वच्छ हेतूने समृद्धी महामार्गाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मात्र या कामासाठी जमीन अधिग्रहणा पासून ते ओव्हर लोड गौण खनिज वाहतुकीपर्यत सर्वकाही अधिकारी व कामाचे ठेकेदार यांच्याच पचनी पडलेले दिसत आहे.

 जनतेच्या हितासाठी निर्माण प्रगती पथावर असलेल्या  समृध्दी महामार्गाचे काम अद्याप तरी जनतेच्या कोणत्याही प्रकरच्या हिताचे झालेले दिसून येत नाही. या महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेल्या ओव्हर लोड  गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यातील रस्त्यांची पूर्णतः चाळणी झालेली दिसून येत आहे. या चाळणी मुळे अनेकांना आपले जीव गमावावे लागले तर कित्येक जण अपंग देखील झालेत. याशिवाय महामार्गाचे काम करीत असलेल्या ठेकेदाराने परिसरात मनमानी गौण खनिज उपसा सुरू करत काही शेतात तर काही पाझर तलवात अवैध उत्खनन केले आहे. याशिवाय  महामार्गाच्या ठेकेदाराने पाझर तलावातील पाणी जेसीबी च्या सहाय्याने परस्पर सांडव्यातून काढल्याने  हा पाझर तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून पाझर तलावाखालील शेतकरी भयभीत झाले आहे.

मृदा व जलसंधारण विभागाचा तालुक्यातील नालेगाव व धोंदलगाव शिवारात पाझर तलाव आहे.हा तलाव संततधार पावसामुळे तुंडूब भरला आहे.या पाझर तलावातून समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने रस्ता तयार केला आहे.या रस्त्यासाठी टाकलेल्या भरावामुळे तलावात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे.त्यातच पावसाच्या जोरामुळे तलावात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.हा तलाव भरल्यामुळे ठेकेदाराचा रस्ता पाण्याखाली गेला आहे.रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे या ठेकेदाराने पाझर तलावातील पाणी सांडव्यातून जेसीबी च्या सहाय्याने परस्पर काढले आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहत आहे.सांडवा नियमबाह्य रित्या उकरल्याने तलावाला धोका निर्माण झाला आहे.तलावाखाली मोठी वस्ती आहे.तलाव फुटल्यास वस्ती व शेती वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी व रहीवाशी घाबरले आहे.त्यांनी मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून देखील हे अधिकारी तिकडे फिरकले नाही.वरीष्ठांनी या बाबींकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Post a comment

0 Comments