युरिया खताच्या विक्रीत ई- पास नोंदणी व प्रत्यक्ष विक्रीत तफावत भराडी येथील मराठवाडा कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित
सिल्लोड -  युरिया खताच्या विक्रीत ई- पास नोंदणी व प्रत्यक्ष विक्रीत तफावत आढळून आल्याने तालुक्यातील भराडी येथील मराठवाडा कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केली असून या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

       मराठवाडा कृषी सेवा केंद्र चालकाकडे होलसेल व किरकोळ असे खत विक्रीचे परवाने आहे. जिल्ह्यातून ज्या कृषी सेवा केंद्रांनी अधिक युरिया खत खरेदी केले अशा वीस रासायनिक खरेदीदारांची ई- पास नोंदणी व प्रत्यक्ष विक्रीची तपासणीसाठी निवड करण्यात आली होती. यात या कृषी सेवा केंद्रांने 675 मेट्रिक टन युरिया (15 हजार बॅगा) खरेदी केल्याने तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी यांना दिले, तर त्यांनी कृषी विभागाला दिले होते. या अनुषंगाने या कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली. 

  कृषी विभागाच्या कृषी सहायकांनी गावागावात जाऊन ज्यांच्या नावाने खत विक्रीचे बील आहे, अशा शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष तपासणी केली. शिवाय भराडी येथे जाऊन प्रत्यक्ष जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोठे, तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी तपासणी केली. यात वरील तफावत आढळून आली. तसेच काही शेतकऱ्यांच्या नावाने आधिकची विक्री दाखवण्यात आल्याचे ही पडताळनीत निदर्शनास आले असे दीपक गवळी यांनी सांगितले.

*...तरी ही युरियाची टंचाई*

  तालुक्यात जवळपास 200 कृषी सेवा केंद्र चालकांकडे खत विक्रीचे परवाने असून त्यांना जवळपास नऊ हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तरी देखील पिकांना खत देण्याच्या हंगामात दुकानांवर चकरा मारुन ही युरिया मिळाला नाही, तर काही दुकानांसमोर तासं- तास रांगेत उभे राहून ही दोन बॅगा, तर काही शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

*खतात ही दुकानदारांची लॉबी*

    खताची रेक लागल्यानंतर होलसेल विक्रेत्यांना पुरवठा केला जातो. त्यानंतर होलसेल विक्रेते त्यांच्या किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करतात. यात ही दुकानदारांची लॉबी असल्याने मार्जितील किंवा जवळच्या दुकानदारांना आधिक पुरवठा केला जातो. यामुळे अनेक विक्रेत्यांना मागणी करुण ही खत मिळत नाही. तालुक्याला पुरवठा करण्यात आलेल्या युरिया खतात ही असाच प्रकार घडलेला आहे. नऊ हजार मेट्रिक टन युरिया 200 दुकानदारांना वाटप केला असता तर एका दुकानदाराला 40- 50 टन युरिया मिळाला असता. पण प्रत्यक्षात असे झाले नाही. काही दुकानदारांना 10- 20 टन देऊन बोळवन करण्यात आली, तर मराठवाडा कृषी सेवा केंद्राला तब्बल 675 मेट्रिक टन पुरवठा करण्यात आला आहे. कृषी विभागाने याचा ही छडा लावणे गरजेचे आहे. असो पण या निमित्ताने का होईना दुकानदारांच्या लॉबीचे पितळ उघडे पडले आहे, हे मात्र नक्की.

Post a comment

0 Comments