महाराष्ट्रात निझामाचं सरकार आहे का आमदार अतुल सावे यांनी सरकारवर टीका


औरंगाबाद ः अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत राम मंदिराचे भुमीपूजन झाले. देशभरात भाजप व हिंदुत्ववादी जनतेकडून जल्लोष साजरा झाला. औरंगाबादेत भाजपने रॅली काढत श्रीरामाचे पुजन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी परवानगी नसल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्यांना रोखले. यामुळे संतप्त झालेले आमदार अतुल सावे, शहर-जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी महाराष्ट्रात निझामाचं राज्य आहे का, असा सवाल करत ठाकरे सरकारचा निषेध केला.
अयोध्येतील कारसेवेत शिवसेना व शिवसैनिकांचा सहभाग मोठा होता. परंतु आज प्रत्यक्षात राम मंदिराच्या भुमीपूजनाचा सोहळा अयोध्येत पार पडत असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना मात्र निमंत्रित करण्यात आले नव्हते. यावरून राज्यातील राजकारण तापलेले असतांनाच आज कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्य सरकारने सार्वजनिकरित्या कुठल्याही प्रकारच्या पुजा व जल्लोषाला परवानगी नाकारली होती.भाजपने जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रीरामाचे पुजन, भजन, लाडू वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातून एक रथ काढून श्रीरामाचेे पुजन करण्यात येणार होते. त्यासाठी श्रीरामाचे मोठे छायाचित्र घेऊन कार्यकर्ते जमले होते. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत श्रीराम पुजन करण्यास परवानगी नसल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्यांना रोखले.त्यामुळे संतापलेल्या अतुल सावे यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये श्रीरामाची पुजा करण्यापासून आम्हाला रोखले जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यात निझामांच सरकार आहे का, आम्ही ठाकरे सरकारचा निषेध करतो असे म्हणत नाराजी व्यक्त केली. शहरअध्यक्ष केणेकर यांनी देखील आमदार सावे यांची री ओढत हे निझामाचं सरकार असल्याची टिका केली.

Post a comment

0 Comments