कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ-प्रा. प्रनिल काळे


फुलंब्री : योगेश तुपे  प्रतिनिधी
औरंगाबाद जिल्ह्यात मुख्यतः खरीपात कापूस, मका, तूर, मूग, उडीद व बाजरी या पिकांचे उत्पादन घेतले जाते, त्यात सध्य स्थितीत कपाशीचे क्षेत्र जास्त आहे मागील काही वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, लाल्या, बोंडअळी अशा विविध संकटात शेतकरी सापडला आहे. कपाशीवर मुख्यत्वे करून तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, मावा तसेच पिठ्या ढेकूण या किडींचा; तर मर, पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. वेळेवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना केल्यास संभाव्य पिकाचे नुकसान टाळता येऊ शकते.
कपाशीवर प्रामुख्याने ठिपक्‍यांची बोंडअळी, हिरवी/ अमेरिकन बोंडअळी आणि शेंदरी बोंडअळी या तीन बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव होतो. सद्यःस्थितीत बीटी कापसामुळे यांचे नियंत्रण करणे शक्‍य होत आहे; परंतु बोंडअळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते, त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन तंत्राचा वापर करून नुकसान टाळावे. 
सध्या वातावरण ढगाळ असल्याणे व कापसाला पाते, फुले लागत असल्याणे गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहेत. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे जेणेकरून त्याचा प्रभाव कमी करता येईल.

Post a comment

0 Comments