कोरोनाला गांभीर्याने घेऊ नका म्हणणाऱ्या डॉ.अनिल पाटील यांचा मृत्यू



मुंबई - कोरोना चायनिज फॅड आहे, त्याला गांभीर्याने घेऊ नका, असं वक्तव्य करुन चर्चेत आलेले डॉक्टर अनिल पाटील यांचं निधन झालं आहे. अनिल पाटील यांच्या वक्तव्याप्रकरणी त्यांना राज्य वैद्यकीय परिषदेकडून नोटीसही पाठवण्यात आली होती. मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचं संकट वाढत चालल्यानंतर अनिल पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झालं होतं. अनिल पाटील यांचा मृत्यू मधुमेहासह विविध आजारांमुळे झाला असल्याचं त्यांच्या प्रवक्त्याने सांगितलं.

५२ वर्षीय अनिल पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. 


प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अनिल पाटील यांना सुरुवातीला मुलुंडमधील फोर्टीसमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कीडनीची समस्या जाणवू लागल्यानंतर त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

कोरोना नव्हे, तर डायरिया, मलेरिया आणि तीव्र श्वसन त्रास या गंभीर समस्या आहे. कोरोना ऐवजी या समस्यांवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं पाटील म्हणाले होते. कोरोनाला कुणीही घाबरू नये, हे चीनचं फॅड आहे आणि याची कोणतीही भीती नाही, असं आवाहन त्यांनी एका मुलाखतीतून केलं होतं.

कोरोनाबाबत हे दावे केल्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती.

दादरमध्ये वेदीक्युअर वेलनेस क्लिनिक अँड हॉस्पिटल या नावाने पाटील यांचं क्लिनिक होतं. ते स्वतःला आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचं सांगत, तर त्यांची डिग्री एमबीबीएस होती. ते महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणीकृत डॉक्टर होते.

Post a comment

0 Comments