मित्राचा खून करून लातूरला पलायन करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून केले जेरबंद


*

भोसरी,पुणे - जिगरी मित्र असलेल्या मित्रांनीच सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. जुन्या भांडणाच्या तसेच हातावर टॅटू काढण्याच्या कारणावरून हा प्रकार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खून केल्यानंतर आरोपी लातूरला पळून जात होते. भोसरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा सोलापूर महामार्गावर पाठलाग करून अटक केली.

मयूर हरिदास मडके (वय २६, रा. मरकळ रोड, आळंदी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगारचे नाव आहे. रोशन हरी सौडतकर (रा. दिघी रोड, भोसरी), मंगेश शुक्राचार्य मोरे (रा. देवंग्रा, ता. औसा, जि. लातुर), प्रणेश चंद्रकात घोरपडे (रा. विजयनगर, दिघी), शुभम बलराम वाणी (रा. चौधरी पार्क दिघी), वैभव तान्हाजी ढोरे (रा. भवानी पेठ, काशेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयूर आणि आरोपी हे एकमेकांचे जिगरी मित्र आहेत. शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मयूर आणि त्याचे दोन आरोपी मित्र दिघी रोडवर दारू प्यायला बसले. त्यानंतर आणखी काही मित्र दारू पिऊन तिथे आले. त्यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून तसेच हातावर टॅटू काढण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपींनी मयूर याच्यावर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या मयूरचा मृत्यू झाला.

याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 302, 324, 352, 143, 144, 146, 147, 148, 149, आर्म अ‍ॅक्ट कलम 4 (25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलिसांनी तपासचक्रे फिरवून आरोपींचा तांत्रिक विश्लेषण करून शोध घेतला. त्यावेळी आरोपी खून केल्यानंतर लातूर येथे पळून जात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुमित देवकर आणि समीर रासकर यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी एक पथक बनवून सोलापूर महामार्गावर त्यांचा शोध घेतला. महामार्गावरून पळून जात असताना पोलिसांनी आरोपींना पाटस तोलनाक्यावर गाठले. भोसरी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, सुमीत देवकर, समीर रासकर, आशिष गोपी, संतोष महाडीक यांच्या पथकाने केली आहे.

Post a comment

0 Comments