औरंगाबादेत मनसेचे खड्डे चुकवा-बक्षिस मिळवा आंदोलन


औरंगाबाद - औरंगाबादेत नेहमीच आपल्या अनोख्या आंदोलनाने महाराष्ट नवनिर्माण सेना चर्चेत असते. विविध राजकीय पक्ष आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसे नेहमीच वेगळे आंदोलन करत असल्याचे दिसून येते. नागरिकांना मानेचे, कमरेचे पट्टे बक्षिस स्वरूपात देत मनसेने सिडकोतील अर्बन बाजार ते मृत्युंजय चौक या रस्त्यावर खड्डे चुकवा-बक्षिस मिळवा आंदोलन करून महापालिका तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

अनेक दिवसांपासून अर्बन बाजार ते मृत्युंजय चौक रस्त्यावरील झालेले खड्डे नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्यावरील खड्डया विरोधात मनपा प्रशासनाचा विरोध करत खड्डे चूकवा-बक्षिस मिळवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जे नागरिक रस्त्यावरील खड्डे चुकवत येत होते अशा नागरिकांना मानेचा पट्टा, कमरेचे पट्टे बक्षिस स्वरूपात देण्यात आले.

जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन मनसेचे गणेश साळुंके यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, चंदू नवपुते, मराठवाडा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील, संतोष कुटे, राहुल कुबेर, हेमंत जोजारे, दीपक पवार, अविनाश पोफळे, महेश डोंगरे, प्रविण मोहिते यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments