घाटी रुग्णालयामध्ये प्लाझ्माथेरपी झालेल्या रुग्णाचा मृत्यूऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात प्लाझ्माथेरपी केलेल्या रुग्णाचा या थेरपीनंतर ५ व्या दिवशी मृत्यू झाल्याचे बुधवारी समोर आले.

कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडी असतात. ज्यामुळे संक्रमणाविरुद्ध प्लाझ्मा मिळालेल्या गंभीर रुग्णांना आजाराशी लढण्यास मदत होते. घाटी रुग्णालयात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर १३ आॅगस्ट रोजी प्लाझ्माथेरपीला सुरुवात झाली. या दिवशी रांजणगाव येथील ४२ वर्षीय कोरोनाच्या गंभीर रुग्णाला  प्लाझ्मा देण्यात आला.

कोरोना रुग्णाच्या उपचारात ‘प्लाझ्माथेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. त्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा गंभीर रुग्णांना देण्यात येतात. घाटीत पहिल्यांदाच एका रुग्णाला प्लाझ्मा देण्यात आला होता; परंतु रुग्णाची प्रकृती गंभीर होती. आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर रुग्णावर लक्ष ठेवून होते; परंतु उपचार सुरू असताना मंगळवारी या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला.

रुग्णाची प्रकृती पाच दिवस स्थिर होती; परंतु मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. आवश्यक असलेल्या रुग्णांवर प्लाझ्माथेरपी केली जाईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. 
 

Post a comment

0 Comments