सॉरी, मेरे भाई, मम्मी-पापा का ख्याल रखना, मुझे माफ कर दे’, असा भावनिक संदेश देत ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

वाळूज महानगर : ‘सॉरी, मेरे भाई, मम्मी-पापा का ख्याल रखना, मुझे माफ कर दे’, असा भावनिक संदेश चुलत भाऊ व जिवलग मित्र याला व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवून ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१८) पंढरपुरात सकाळी उघडकीस आली. मोहम्मद समीर मोहम्मद जफर असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

मोहम्मद समीर मोहम्मद जफर (३०, रा. टीचर कॉलनी, परभणी) हा वर्षभरापूर्वी वाळूज एमआयडीसीत आला होता. परभणी येथील अनेक नातेवाईक पंढरपूर येथे असल्यामुळे त्यांच्या शेजारीच रूम किरायाने घेऊन तो राहत होता. परिसरात बांधकाम मिस्तरी म्हणून तो काम करीत होता. चांगल्या स्वभावामुळे समीरला नवीन काम मिळत गेल्यामुळे कुटुंबीय आनंदात होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने काम मिळणे बंद झाले. त्यामुळे तो घरीच राहत होता. अशातच सोमवारी रात्री जेवण करून मो. समीर हा घरात झोपी गेला होता. 

सोमवारी मध्यरात्री ३ वाजून ३ मिनिटांच्या सुमारास मो. समीरने परभणी येथील जिवलग मित्र तथा चुलत भाऊ शेख जुबैर याच्या मोबाईलवर ‘सॉरी, मेरे भाई, मम्मी-पप्पा का ख्याल रखना, मुझे माफ कर दे’, असा संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविला. मंगळवारी सकाळी जुबैरने सकाळी मोबाईल बघितला. त्याला मो. समीरचा संदेश दिसला. यानंतर जुबैरने मो. समीरशी संपर्क साधला. मात्र, त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे जुबैरने समीरसोबत काम करणाऱ्या मित्रांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. काही वेळानंतर समीरने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर समीर काही दिवस परभणीला गेला होता. तीन आठवडे गावी राहिल्यानंतर तो परत वाळूज एमआयडीसीत आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे काम मिळत नसल्याने तो निराश होता. 

आर्थिक अडचणीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय मो. समीरचे वडील मो. जफर व  चुलत भाऊ जुबैर यांनी वर्तविला आहे.


पंख्याला घेतला गळफास 
जुबैरचा फोन आल्यानंतर मो. समीरचे मित्र मो. गौस, मोहसीन शेख हे सकाळी ९ वाजेच्या सुमारास समीरच्या घरी गेले. बराच वेळ समीरच्या घराचा दरवाजा त्यांनी ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद येत नसल्याने या मित्रांनी दरवाजा जोरात ढकलून घरात प्रवेश केला. तेव्हा मो. समीर घरातील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या मित्रांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याला माहिती कळविली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोहेकॉ. सुखदेव भागडे, पोकॉ. शरद वेताळ आदींनी घटनास्थळ गाठून मो. समीरला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. 

Post a comment

0 Comments