खरीप हंगाम 2020 मध्ये पेरलेले सोयाबीन बियाणे स्थानिक पातळीवर जतन करून पुढील खरीप हंगामासाठी वापरा - डॉ. टी. एस. मोटे


सोयगाव,दि.२६ (प्रतिनिधी) : -
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे
यावर्षी खरीप हंगामात बोगस सोयाबीन बियाणे पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यामुळे पुढील वर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यातील सावळदबारा व नांदगाव येथे कृषी विभागामार्फत  शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे जतन करून पुढील वर्षी लागवडीसाठी उपयोगात कसे आणायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस प्रशिक्षणासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे , जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, मोहिम अधिकारी एस. एल. हिवाळे , तालुका कृषी अधिकारी अरविंद टाकणखार, कृषी अधिकारी गवळी इत्यादी उपस्थित होते.  डॉ. टी. एस. मोटे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बीजोत्पादन क्षेत्र हे इतर सोयाबीन पीक वाणापासून 3 मीटर अंतरावर असावे, सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो त्यावर उपाय म्हणून कोणते कीटकनाशक व किती प्रमाणात फवारणी करावी जेणेकरून किडीमुळे बियाणे उत्पादकता तसेच गुणवत्ता कमी होणार नाही याबद्दल माहिती दिली त्याच बरोबर ज्या प्लाँटमधे बियाणे रोखून ठेवणार आहेत त्या प्लाँट मधील भेसळ झाडे काढून टाकावीत. भेसळ म्हणजे (साधारण पिकापेक्षा कमी जास्त उंचीची, वेगवेगळ्या रंगाची फुले व शेंगा).तसेच रोगट झाडे काढून टाकावीत, बियाण्याची उगवण क्षमता कायम राखण्याकरिता कापणी पूर्वी त्यावर बाविस्टीन किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची फवारणी करावी, मळणी यंत्राचा वापर करताना मळणी यंत्राचे फेरे ३५० ते ४५० पेक्षा अधिक असू नये याबद्दल मार्गदर्शन दिले. यानंतर आनंद गंजेवार यांनी शेतकऱ्यांनी बियाणे साठवणूक करताना कशाप्रकारे काळजी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन करताना सांगितले की बियाणे साठवलेल्या पोत्यांची थप्पी सात पोत्यांपेक्षा उंच जाणार नाही याची दक्षता घ्यावी, बियाण्याची साठवणूक ओलसर किंवा दमट जागेच्या ठिकाणी करू नये, बियाणे व खत यांची एका ठिकाणी साठवण करू नये, सोयाबीन बियाण्याचे कवच नाजूक असल्यामुळे त्यांची कमीत कमी हाताळणी करावी,शेतकऱ्यांनी स्वतःकडील पेरणी योग्य सोयाबीन ३ वेळा  उगवणक्षमता चाचणी करुनच पेरणी करावी. अशा प्रकारे बियाणे निर्मिती, काढणी व साठवणुकीच्या काळात काळजी घेतल्यास दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व चांगली उगवणशक्ती असलेले  बियाणे निश्चितच आपण घराच्या घरी निर्माण करू शकतो असे सांगितले . कार्यक्रम संपल्या नंतर MAUS  १५८ या सोयाबीन जातीच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्राला भेट दिली. तसेच           
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास कुमावत यांनी केले.याप्रसंगी  मंडळ कृषी अधिकारी जाधव , कृषी सहाय्यक किशोर महाजन, कैलास कुमावत, सचीन पाटील, मयूर पाटील, सुरडकर , कृषी समूह सहाय्यक सौ.रुपाली घुगे पत्रकार बांधव व  परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सोशल डिस्टन्टंचे नियामाचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी अरविंद टाकणखार यांनी आभार प्रदर्शनाद्वारे  कार्यक्रमाचा शेवट केला.

Post a comment

0 Comments