सिल्लोड, तालुक्यातील वडाळा येथील अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकलीचा डेंगू सदृश आजाराने मृत्यूसिल्लोड -तालुक्यातील वडाळा येथील अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकलीचा डेंगू सदृश आजाराने मृत्यू झाला. चिमुकलीवर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार दरम्यान मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण आहे.

      हिंदवी सुरेश शेळके (सहा महिने) असे डेंगू सदृश आजाराने मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

        मयत चिमुकलीला ताप येत असल्याने सोमवारी सिल्लोड शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणीत डेंगू सदृश आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील उपचारासाठी रात्रीच औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असतांना मंगळवारी सकाळी चिमुकलीचा मृत्यू झाला.

      सध्या पावसाळा सुरु असल्याने गावाच्या आवती- भोवती गाजर गवत तसेच पाण्याचे डबके साचलेले आहे. यामुळे डासांचा सुळसुळाट ही वाढल्याने गावात पुन्हा डेंगू सदृश आजाराने डोके वर काढले आहे. आधीच नागरिकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण झालेली आहे. त्यात डेंगू सदृश आजाराने डोके वर काढल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.

*गेल्या वर्षी तिघांचा झाला होता मृत्यू*

     गेल्या वर्षी तर गावात डेंगू सदृश आजाराने अक्षरशः थैमान घातले होते. डेंगू सदृश आजारामुळे तिघांचा मृत्यू झाला होता. आठ दिवस आरोग्य विभाग गावात तळ ठोकुन होते. त्यानंतर डेंगूची साथ आटोक्यात आली होती. या वर्षी पुन्हा अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकलीला जिव गमवावा लागला.

Post a comment

0 Comments