विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन

गंगापूर

( प्रतिनिधी प्रकाश सातपुते )
केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात तसेच कोळसा रेल्वे विमानतळे एलआयसी अंतराळ संशोधन संस्था आदी सार्वजनिक उद्योगांची  विक्री करण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ आज आयटक प्रणीत अंगणवाडी कर्मचारी युनियन व लालबावटा शेतमजूर युनियन च्या वतीने गंगापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.लोकशाही,सांसदीय मूल्ये व संविधानावरील हल्य्याचाही हातात तिरंगी व लाल झेंडे घेऊन निदर्शकांनी तीव्र निषेध केला. खाजगीकरण थांबवा, सरकारी उद्योगांची विक्री थांबवा, संविधान व लोकशाहीवरील हल्ले थांबवा,कोरोना कामाची सक्ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करू नका, रोजगार हमी मजुरांचे थकित वेतन द्या, अंगणवाडीच्या रिक्त जागा भरा,
टाकळीवाडीच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करा,चर्चेविना संसदेत कायदे मंजूर करू नका, संविधान बचाव ,देश बचाव अशा जोरदार घोषणांनी तहसिल परिसर दणाणून गेला. या निदर्शनाचे नेतृत्व आयटक चे राज्य उपाध्यक्ष तसेच लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष काॅ. प्रा.राम बाहेती जिल्हा सचिव गणेश कसबे, गंगापूर तालुका सचिव कैलास कांबळे, विलास शेंगुळे, सीमा व्यवहारे मंदाकिनी लुंगाडे, सुनंदा गोरे, संगीता जोशी, इब्राहिम पटेल आदींनी केले.निदर्शनानंतर तहसीलदार अविनाश शिंगटे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन तातडीने पंतप्रधानांना व मुख्यमंत्र्यांना आजच पाठवण्याचे आश्वासन तहसिलदार शिंगटे यांनी आंदोलकांना दिले. टाकळीवाडीच्या रोजगार हमीमधून झालेल्या तीन किलोमीटर रस्त्याच्या कामाचे वेतन देण्यासंदर्भात चौकशी करण्याची, सय्यदपुर ते हनुमंत गावचा रस्ता व  इतर प्रश्नासंदर्भात सर्व संबंधितांना पत्र लिहिण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. तसेच पुढच्या आठवड्यात पुन्हा स्थानिक प्रश्नावरच्या मागण्यांसंदर्भात किती प्रगती झाली यासाठी लालबावटाच्या कार्यकर्त्यांना तहसील कार्यालयात पुन्हा चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे. पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने कोरोना काळात उद्योगपतींचे खिसे भरण्याचे काम सुरू असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.  शिक्षण, आरोग्य, राशन, रोजगार आदीचा पुरता बोजवारा मोदी सरकारच्या  काळात उडाला असाही आरोप यावेळी करण्यात आला.निदर्शनामध्ये संतराम कांबळे ,गोकुळ भगुरे, संजय संजय नाना दुशिंगे,धोंडीराम झिंजुर्डे, दीपक काशीद, ज्ञानेश्वर झिंजुर्डे ,गोरा पवार आदी सहभागी झाले होते. संविधानावर व लोकशाही मूल्यावर हल्ले होत असल्याचा निषेध करण्यात आला.लाल झेंडा सोबत तिरंगा झेंडे घेऊन संविधान बचाव देश बचाव लोकशाही बचाव अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
निदर्शनामध्ये अनेक अंगणवाडी कर्मचारी शेतमजूर रोहयो मजूर व शेतकरीही सहभागी झाले होते.

Post a comment

0 Comments