औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन नाही; मात्र बाजारपेठांसाठी निर्बंध


औरंगाबाद -
कोरोना विषाणूच्या संसर्गाने जिल्ह्याला विळखा घातलेला आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण पडत असून, शहर व जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होण्यासारखी स्थिती असल्याच्या अफवांचे पेव सोशल मीडियातून फुटले आहे. त्याला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. आता जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाही. मात्र, रात्री ९ वाजेनंतर सर्व बाजारपेठा बंद करण्यात येतील, याबाबत आदेश देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 


लॉकडाऊन, कोरोना रुग्णवाढ आणि सोशल मीडियातील अफवा याबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले, १६ सप्टेंबरपासून जिल्हा व शहरातील बाजारपेठा रात्री ९ वाजेनंतर बंद करण्यात येतील. रात्री ९ वाजेनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी कायम दिसते आहे. नागरिक कोरोनाच्या अनुषंगाने असलेल्या सुरक्षासाधनांचा वापर करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रात्री ८.३० वा. बाजारपेठा, व्यापारीपेठांमधील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी वेळ असेल.  त्यानंतर ९ वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद करण्यासाठी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. रात्री होणारी गर्दी यातून कमी होईल, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करणे हा शेवटचा पर्याय आहे; परंतु आता पुनश्च: हरिओम करण्याबाबत शासनाने अनलॉक सुरू केले आहे. लॉकडाऊनच्या अनेक नियमांत शिथिलता आणली आहे. जनता कर्फ्यू राबविणे शक्य आहे, मात्र ते सध्या राबविता येईल, असे वाटत नाही. 


१७०० बेडस् आठवडाभरात वाढणार
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना किमान आॅक्सिजनचा बेड तरी तातडीने मिळावा, यासाठी आठवडाभरात १७०० बेडस् आॅक्सिजनसह उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments