आयसीयू बेडसाठी रुग्ण पुण्याकडे; कोविड, नॉनकोविड रुग्णांचे औरंगाबादेत हालऔरंगाबाद : शहरातील आरोग्य यंत्रणा किती अशक्त आहे, याची प्रचीती  आता येत आहे. मागील तीन दिवसांपासून शहरातील एकाही रुग्णालयात आयसीयूमध्ये बेड उपलब्ध नाही. त्यामुळे कोविड, नॉनकोविड रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. औरंगाबादहून पुण्याला रुग्ण कार्डियाक अ‍ॅम्बुलन्सने रवाना होत आहेत. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईकांची प्रचंड धावपळ पाहायला मिळत आहे. 

राज्याच्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची लोकसंख्या १५ लाखांहून अधिक आहे. या लोकसंख्येसाठी शहरातील प्रमुख १६ लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये आयसीयूत फक्त ३२६ बेड आहेत. यातील एकही बेड रिकामा नाही. हे बेड मिळविण्यासाठी रुग्णांची रांग लागलेली आहे. रुग्णाला डोळ्यांसमोर मृत्यूच्या खाईत ढकलण्यापेक्षा इतर शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू आहे. २ दिवसांपूर्वी हिमायतबाग भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला न्यूमोनिया झाला. कोरोना तपासणी निगेटिव्ह आली. रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू लागली. शहरात एकाही रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. नातेवाईकांनी बरीच मेहनत घेतल्यानंतर पुण्यात पिंपरी चिंचवड येथे एका रुग्णालयात बेड उपलब्ध झाले. पुण्याहून खास कार्डियाक अ‍ॅम्बुलन्स मागून रुग्णाला शिफ्ट करण्यात आले.

मागील ६ महिन्यांपासून शासकीय यंत्रणा कोविडचा मुकाबला करीत आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले. मात्र, आयसीयूमधील बेड वाढविण्याचा सर्वांनाच विसर पडला. आता परिस्थिती बिकट झाल्यानंतर ‘बेड वाढवा... बेड वाढवा...’ अशी ओरड अधिकाऱ्यांकडून सुरू झाली आहे. पलंग आणि गादी टाकली तर बेड वाढत नाहीत, याचा शासकीय यंत्रणेला बहधा विसर पडला असेल. आयसीयूमधील बेड वाढविण्यासाठी आॅक्सिजन, व्हेंटिलेटर आणि तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची गरज असते. 

Post a comment

0 Comments