वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अखिल भारतीय छावाची मागणी


 
पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:

ढोरकीन : पैठण तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे ढाकेफळ, ढोरकीन, बोरगाव, टाकळी सह आदी गावातील परिसरात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. अतिवृष्टी व वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या विविध पिकांचे नमुने तहसिलदार यांना भेट देऊन आगळीवेगळी गांधीगिरी करत प्रशासनाचे लक्ष वेधून नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने नुकतीच तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात आली.

पैठण तालुक्यात मागील तीन-चार दिवसापुर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, तुर, मका, कपाशी, उस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून या वर्षी सुरुवातीपासून वरुन राजाची चांगली कृपादृष्टी असल्याने शेतकऱ्यांनी कर्ज, उसनवारी, सोने नाणे गहाण ठेवून मोठ्या प्रमाणात बि-बियाणे, खते, मशागतीवर भरमसाठ पैसे खर्च केले परंतु अतिवृष्टीमुळे पिके सडण्यास सुरवात झाली असून त्यातच तीन-चार दिवसापुर्वी वादळीवाऱ्यासह मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने, शेतातील सर्व उभी पिके झोपली गेली आहे. यंदाचे हाता तोंडाशी आलेले सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातातुन गेले आहे. मागील चार वर्षाच्या दुष्काळाचे चटके सहन करुन शेतकरी राजा तब्बल २० वर्षाने जोमाने उभा राहीला होता परंतु अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने यंदा शेतकऱ्यांना ओला दुष्काळाचा देखील चटका बसला आहे. तालुक्यातील ढाकेफळ व इतर परिसरातील शेतकऱ्यांच्या विहीर व बोअरवेलचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने हे सर्व पाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाच्या शेतात साचल्याने पाण्याने शंभर टक्के नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे येत्या ८ दिवसात संबंधीत कृषिधिकारी, तलाठी, मंडळाधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. नसता अखिल भारतीय छावा संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. निवेदनावर छावाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत, तालुकाध्यक्ष किशोर सदावर्ते, तालुका प्रवक्ते अर्जुन खराद, आप्पासाहेब गिरगे, महेश शिंदे, ओमकार टेकाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a comment

0 Comments