गंगापूर तालुक्यात नउ पैकी आठ मंडळात वर्षिक सरासरीपेक्षा अधिक पाउसचार लघु मध्यम प्रकल्प १०० टक्के पाणीसाठा, तीन प्रकल्प कोरडेच.गंगापूर
(प्रतिनिधी प्रकाश सातपुते) 
गंगापूर तालुक्यात यावर्षी नउ वर्षानंतर समाधानकारक पाउस पडत असल्यामुळे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत नउ मंडळांपैकी  आठ मंडळांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाउस पडला असून तालुक्यातील सात लघु मध्यम प्रकल्पापैकी चार प्रकल्प शंभर टक्के भरले आहे तर तीन प्रकल्प आजही कोरडे असल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, तालुक्यात २०११ नंतर समाधानकारक पाउस नसल्याने प्रत्येक वर्षी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासून तालुक्यात सर्वदूर पाउस पडत असल्याने ९ मंडळांपैकी डोणगाव मंडळाचा अपवाद वगळता आठही मंडळांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाउस झाला आहे.
तालुक्यातील वार्षिक सरासरी ६२५ असून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत तालुक्यातील गंगापूर मंडळामध्ये ८८६, भेंडाळा ७४४, मांजरी ९६९, सिध्दनाथ वाडगाव ८९४, हर्सुल १०१५, तुर्काबाद ११८८, वाळूज १०२८, शेंदुरवादा १०८७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाउस तालुक्यात डोणगाव मंडळामध्ये झाला आहे.
सिल्लेगाव, धामोरी प्रकल्प कोरडेच
एवढा पाउस होउनही तालुक्यातील चाळीस ते पन्नास गावांसाठी सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या असलेल्या सिल्लेगाव व धामोरी प्रकल्पामध्ये यावर्षी अवघे पाच ते दहा टक्के पाणीसाठा आहे. याचे मुख्य कारण डोणगाव मंडळामध्ये पडलेला कमी पाउस व या प्रकल्पामध्ये पाणी येण्याचे मुख्य स्रोत असलेल्या पाचपीरवाडी येथील तलावात डोंगरातून येणारे पाणी इतरत्र वळवल्याने सिल्लेगाव व धामोरी प्रकल्प यावर्षी अद्यापर्यंत कोरडेच असलेले दिसत आहे. अशीच अवस्था पोळ रांजणगाव लघु प्रकल्पाची असल्याने पुढील काळात या ठिकाणी जायकवाडी किंवा अन्य ठिकाणाहून प्रकल्पात पाणी आणणे गरजेचे होणार आहे. 
चार प्रकल्प भरले
तालुक्यातील ७ पैकी पाच प्रकल्पांमध्ये दहा वर्षाच्या खंडानंतर प्रथमच शंभर टक्के भरल्याने पुढील एकदोन वर्षाचा पिण्याचे व सिंचनाच्या पाण्यासाठी हातभार लागणार आहे. त्यामध्ये टेंभापुरी लघुमध्यम प्रकल्प १०० टक्के, गवळीशिवरा लघुप्रकल्प १००टक्के, पळसगाव प्रकल्प १०० टक्के, देऱ्हळ ९० टक्के याशिवाय तालुक्यातील इतर पाझर तलावांमध्ये यावर्षी समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
सोबत फोटो….
तालुक्यातील शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्पात अवघा दहा टक्के पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांनी तलावातच पिकांची लागवड केली असल्याचे  छायाचित्रात दिसत आहे.

Post a comment

0 Comments