औरंगाबाद जिल्ह्यातील वीज प्रश्न मार्गी लागेल.



मुंबई, दि.२७ सोमवार :औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योग, शेतकरी यांना सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी व महाविरणच्या सहसंचालकांनी संयुक्तपणे उपाययोजना करून त्यासंदर्भातील कार्यअहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिले.

औरंगाबाद जिल्ह्यातील वीजेच्या प्रश्नांवर आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी उर्जामंत्री नितीन राऊत, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील कृषीपंपाना नियमित वीज पुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी रोहित्रे नादुरूस्त असल्याच्या तक्रारी आहेत. रोहित्रांसाठी ऑइल उपलब्ध होत नाही. औरंगाबाद शहरातील ३३ केव्ही उपकेंद्रांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी पडेगाव येथे २२० केव्ही वाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार आंबादास दानवे यांनी केली. कन्नड विभागाचे विभाजन करून सिल्लोड विभागाची निर्मिती करणे, कृषी पंपांचा वीज पुरवठा सुरळीत करणे आदी मागण्या यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडल्या. यावर पालकमंत्री तसेच उर्जामंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. रोहित्रांना लागणारे ऑइल स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याची तयारी महावितरण कंपनीने दर्शविली. अनेक उपकेंद्रांवरील वीजेचा दाब कमी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, या सर्व प्रश्नांवर जिल्हाधिकारी तसेच महावितरणच्या सहसंचालकांनी एकत्रित उपाययोजना करणारा अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जिल्ह्यातील विजेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावला जाईल, शेतकरी, उद्योजकांना दिलासा देण्याची ग्वाही यावेळी श्री. देसाई यांनी दिली.

Post a comment

0 Comments