आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना गंगापुरात मराठा क्रांती मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन


गंगापूर(प्रतिनिधी प्रकाश सातपुते) 

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आलेली स्थगिती उठविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी मागणी गंगापूर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
   यासंदर्भात तहसील कार्यालयात तहसीलदार अविनाश शिंगटे यांना सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा गंगापूर तालुका यांच्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी दि. ३० सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या विवेक कल्याण रहाडे याला व आतापर्यंत आरक्षण आंदोलनात आत्मबलिदान केलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्याप्रसंगी युवकांना संयोजकांतर्फे आत्महत्या न करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी भारताचे पंतप्रधान व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे स्वतंत्रपणे तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात येउन उपस्थितांसमोर शिवकन्या प्रेरणा अविनाश पाटील व वैशालीताई मोरे यांनी वाचन केले.  त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारतर्फे सुप्रिम कोर्टाने दिलेली स्थगीती उठवण्यासाठी E.W.S. प्रमाणे संसदेत कायदा करून वा अन्य पर्यायांचा वापर करून समाजाला देण्यात आलेले आरक्षण टिकवण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.
   तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे तत्काळ कारवाई करावी अध्यादेश काढण्याबाबत निर्णय घेणे किंवा इतर पर्यायांचा विचार करणे, कोपर्डी घटनेतील आरोपींना तत्काळ शिक्षा होण्यासाठी न्यायालयाला विनंती करणे , शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गंगापूर तालुक्यातील कायगांव येथील मराठा आरक्षण आंदोलनात व राज्यभर दाखल झालेले गंभीर व खोटे गुन्हे व्हीडीओ फुटेज पाहून तत्काळ मागे घेण्यात यावेत.
      सुरू झालेल्या शैक्षणिक प्रक्रीयेमध्ये समाजातील विद्यार्थयांना जागा वाढवून १३ टक्के प्रवेश देता येण्यासाठी तत्काळ काय कारवाई करता येईल याबाबत योग्य तो निर्णय घेणे. पोलिस भरतीसह सरकारच्या अखत्यारितील नोकर भरती प्रक्रिया आरक्षण स्थगिती उठेपर्यंत स्थगित ठेवणे. सारथीची कमी करण्यात आलेली कर्मचारीसंख्या वाढवणे व जास्तीत जास्त आर्थिक तरतूद करणे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे निधीच्या तरतूदीअभावी थांबलेल्या कामाला गती येण्यासाठी पुरेशा निधीची घोषणा करणे.  आरक्षण आंदोलनात आत्मबलिदान केलेल्या ५० बांधवांना जाहीर केलेली मदत व नोकरी तत्काळ देण्यात यावी. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
याप्रसंगी तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या भावना पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे पोचवून गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील आंदोलनातील दाखल झालेल्या गुन्हे शासनाच्या निर्णयाप्रमाणे मागे घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनामध्ये समाजातील समन्वयक, कार्यकत्यांसह, तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपसह सर्वच राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
सोबत फोटो….

Post a comment

0 Comments