मोठी बातमी! आरे मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..मुंबई, दि.११ रविवार :  मुंबईतील आरेची ८०० एकर जागा जंगल घोषित करण्यात आली आहे. तसेच, आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. एक म्हणजे आरेतील जागा जंगल घोषित केली आहे. आधी ६०० एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून ८००एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत ८०० एकराचे जंगल असणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, आरेचे जंगल टिकवणे आपले काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे आरेतील प्रस्तावित मेट्रोचे कारशेड आता कांजूरमार्गला करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता आरेमध्ये मेट्रोचे कारशेड होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'कांजुरची जमीन शून्य रुपये किंमतीने सरकारने दिलेली आहे. त्यावर आता मेट्रो कारशेड उभे राहणार आहे. आरे जंगलात साधारण १०० कोटींचा खर्च करून एक बिल्डिंग उभारली आहे. ते पैसे वाया जाणार नाहीत. बिल्डिंग अन्य कारणासाठी वापरणार आहोत. या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील. एकही पैसा वाया जाऊ देणार नाही. तसेच, आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी सांगितले...

Post a comment

0 Comments