राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित अंदाजापेक्षा ५९ लाख टनाने वाढली, उपलब्धता ८७४ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

 आयुक्तालयाने विविध साखर कारखान्यांकडून घेतलेल्या मागोव्यानंतर ८१५ लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज गेल्या महिन्यात व्यक्त केला होता. मात्र, सुधारित अंदाजानुसार हीच ऊस उपलब्धता आता ६.७५ टक्क्यांनी जादा दिसते आहे. “मॉन्सून सुरू झाल्यानंतर  उसाचे लागवड क्षेत्र आम्ही पहिल्या अंदाजात १० लाख ६६ हजार हेक्टरपर्यंत गृहीत धरले होते. त्यातून गाळपासाठी ८१५ लाख टन ऊस अपेक्षित होता. याच ऊस उपलब्धतेनुसार साखर उत्पादन ९२ लाख टन अपेक्षित होती. मात्र, आता पावसामुळे सर्व गणिते बदलली आहेत,” अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसऱ्या अंदाजानुसार, आता राज्यातील ऊस लागवड ११ लाख ४२ हजार हेक्टरच्या पुढे गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे गाळपाला किमान ८७४ लाख टन ऊस मिळू शकेल. उतारा साडेअकरा टक्के मिळाल्यास साखर उत्पादन सहजपणे ९९ लाख टनावर जाईल, असे साखर आयुक्तालयाला वाटते.  महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचा ''ऊस उपलब्धता अंदाज'' मात्र आयुक्तालयापेक्षाही जादा आहे. साखर आयुक्तालयाच्या अंदाजापेक्षाही किमान २५ ते २६ लाख टन जादा ऊस राज्यात उभा आहे. ऊस भरपूर असल्याने वेळेत गाळप, जादा इथेनॉल निर्मिती आणि आर्थिक शिस्त या त्रिसूत्रीवर भर देण्याचा आग्रह आम्ही कारखान्यांना करतो आहे, असे संघाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 

Post a comment

0 Comments