एसटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार थकला; दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा

पुणे: ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेल्या एसटी सेवेतील कर्मचारी दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचे अस्त्र उपसण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यासाठी राज्यातील एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रोश करणार आहेत. प्रलंबित वेतनासाठी ९ नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करतील. 

दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करावे. तसेच एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यभरात दोन हजारांहून अधिक कर्मचारी कोरोनाबधित झाले असून आत्तापर्यंत ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. आम्हा सर्वांची दिवाळी चांगली जावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकर निर्णय घ्यावा, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a comment

0 Comments