महापौर विरुद्ध आयुक्त वादाला आता नवं वळण; आक्रमक भूमिकेवरुन शिवसेनेतच दुही

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि आयुक्तांमधील वाद शमला असे वाटत असतानाच आता याप्रकरणाला पुन्हा नवे वळण लागले आहे. 
शिवसेनेच्या काही नेत्यांनी आयुक्तांविरुद्ध घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून पक्षातील नेत्यांमध्येच एकमत नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर कडाडून टीका केली होती. आमचे प्रश्न सोडवायला वेळ नसेल तर इकबाल सिंह चहल यांच्याऐवजी दुसरा अधिकारी आणावा, असे विशाखा राऊत यांनी म्हटले होते. 
मात्र, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी वेगळीच भूमिका मांडली. महापौर ठिय्या आंदोलनाला बसल्या त्या महापौर म्हणून नव्हे तर विभागाच्या नगरसेविका म्हणून बसल्या होत्या. उद्धटपणे उत्तरे देणाऱ्या महापालिका आयुक्तांना परत पाठवा, ही शिवसेना पक्षाची भूमिका नाही, पक्ष अशी मागणी करणार नाही, असे जाधव यांनी म्हटले. एकूणच यशवंत जाधव हे किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता मूळ वाद बाजूला पडला असून पालिकेत शिवसेना नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरु झाली आहे

Post a comment

0 Comments