महसूल,वन,बांधकाम व पोलिसांच्या आशीर्वादाने हसनाबाद परिसरात अवैद्य वृक्ष कत्तल सुरू.वरिष्ठ प्रशासन लक्ष देऊन अवैद्य वृक्ष तोड थांबवतील काय? वृक्षप्रेमी यांची मागणी.


     भोकरदन -तालुक्यातील हसनाबाद परिसरात सध्या अवैद्य वृक्षतोडीने थैमान घातले असून परिसरातील बोरगाव खडक,खडकी,सिरसगाव वाघ्रळ,खादगाव,विटा,सावखेडा,गोषेगाव  ,वजीरखेडा इत्यादी गावांसह तालुक्यामध्ये सर्रासपणे बिनधास्त दिवसाढवळ्या अवैद्य वृक्षतोड होत आहे,तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली वीस-वीस,तीस-तीस वर्षांपूर्वीची झाडे विनापरवाना तोडून झाडांची तस्करी करणारे व्यापारी बिनधास्तपणे कत्तल केलेली झाडे मोठ्या गाडीत भरून झाडांची तस्करी करीत आहे. 
       वृक्षतोड साठी लागणारा महसूलचा परवाना किंवा वन विभागाचा परवाना काढण्यात येत नाही, तसेच रस्त्याच्या कडेला असलेली झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीशिवाय तोडण्यात येत आहे.या अवैद्य वृक्षतोडी मध्ये महसूल विभाग वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन यांचा हात असून या सर्व विभागांना माहिती देऊनही अवैद्य वृक्षतोड प्रकरणात संबंधित प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.त्यामुळे अवैद्य वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांची दादागिरी वाढली आहे ते दिवसाढवळ्या वृक्षतोड करून बिनबोभाटपणे वाहतूक करीत आहे.
     या प्रकरणाकडे भोकरदन चे तहसीलदार संतोष गोरड,मंडळ अधिकारी तसेच तलाठी, वन विभागाचे तालुका वन आधिकारी राठोड, वनरक्षक शिनगारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कोल्हे व स्थानिक हसनाबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी याकडे काना डोळा करीत आहे.
     शासन दरवर्षी 'झाडे लावा झाडे जगवा' या उपक्रमाअंतर्गत लाखो झाडे लावत असून यावर करोडो रुपये खर्च करीत आहे, मात्र स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ व अवैद्य वृक्षांची व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून स्वतःची खळगी भरत असलेल्यामुळे अनेक झाडांची कत्तल होत आहे,याकडे वरिष्ठ प्रशासन विभागाने लक्ष देण्याची गरज असून ही होणारी अवैद्य वृक्ष कत्तल थांबवावी अशी मागणी वृक्ष प्रेमींनी केली आहे.

Post a comment

0 Comments