सिल्लोड विभागीय कार्यालयाचा प्रस्ताव तातडीने सादर करा ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देशमुंबई - महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळातील कन्नड विभागाचे विभाजन करून सिल्लोड येथे नवीन विभागीय कार्यालय सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. 

   आज मुंबई येथे महावितरणच्या मुख्यालयात सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न व वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व महावितरणचे प्रभारी संचालक (संचालन) सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते, मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अधीक्षक अभियंता संजय अकोडे, अधीक्षक अभियंता संजय सरग आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
    सध्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात सिल्लोड व सोयगाव येथे महावितरणची उपविभागीय कार्यालये आहेत. मात्र विभागीय कार्यालय कन्नड येथे आहे. सिल्लोड व सोयगावमधील वीजग्राहकांना कन्नड येथे जाणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे वीज ग्राहकांच्या सोयीसाठी सिल्लोड येथे विभागीय कार्यालय सुरू करणे गरजेचे आहे. तसेच सध्याच्या सिल्लोड उपविभागाचे विभाजन करून दोन उपविभाग तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना डॉ. नितीन राऊत यांनी सहव्यवस्थापकीय संचालक, औरंगाबाद यांना दिल्या आहेत.

    याशिवाय अतिभारीत रोहित्रांची क्षमतावाढ करण्यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीला गती देणे, नादुरुस्त रोहित्रे तातडीने दुरुस्त करणे आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात व इतर विविध वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले.

Post a comment

0 Comments