महामार्गावर खासगी आरामबसमध्ये सापडला साडेतीन कोटींच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा खजिना.


सातारा, दि, २७. मंगळवार :  कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्सवर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून अवैधरीत्या वाहतूक होत असलेला सोन्या-चांदीचा मोठा साठा जप्त केला. डोळे दिपवणाऱ्या या खजिन्याची किंमत तब्बल ३ कोटी ६४ लाख १४ हजार १०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हा खजिना कोणाचा व कोठे पाठवला जात होता याविषयी अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याविषयी जनतेत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या एका खासगी प्रवासी बसमधून सोन्या-चांदीची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे बोरगाव पोलिसांनी महामार्गावर नागठाणे येथे सापळा लावला.

मिळालेल्या माहितीप्रमाणे ‘ती’ कार्तिक ट्रॅव्हल्सची (एमएच 09 सीव्ही 1179) आरामबस आली असता पोलिसांनी तात्काळ ती बस अडवली. त्यानंतर बसची झडती घेतली असता बसमध्ये कोणाला संशय येणार नाही अशा ‘अवतारात’ हा खजिना हाती लागला.

पोलिसांनी बस पोलीस ठाण्यात आणून ही पोती ताब्यात घेतली. या पोत्यांची संख्या २० ते २५ च्या आसपास असून ती सोने-चांदीच्या विविध प्रकारच्या दागिन्यांनी खचाखच भरलेली आढळली.

या मुद्देमालाची मोजदाद केल्यावर ३ कोटी ५४ लाख ७६ हजार ८०० रुपयांची ५९१ किलो २८० ग्रॅम चांदी, ९ लाख ३७ हजार ३०० रुपयांचे १९ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३ कोटी ६४ लाख १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या सोने, चांदीचे मूल्यांकन व मोजमाप करण्याचे काम दिवसभर सुरू होते. याच्या मूल्यमापनासाठी पोलीस लॉकअपचा परिसर पोलिसांनी मोठा प्लास्टिक कागद लावून पॅक केला होता. याप्रकरणी काही लोकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.

Post a comment

0 Comments