नाफेड च्या सयुंक्त महाओनियन केंद्राचे खंडाळा येथे मुख्यमंत्रांच्या हस्ते ई लोकार्पण

वैजापूर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन


 औरंगाबाद जिल्ह्यात कांदा  उत्पादन घेण्याकडे कल असलेला शेतक-याचा मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर  तालुक्यातील खंडाळा येथे महाएफपीसी व नाफेड यांच्या संयुक्तपणे महाओनियन प्रकल्पा अंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत उभारलेल्या 1000 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा साठवणूक गृह, प्रतवारी विभाग, वजनकाटा केंद्राचे लोकार्पण १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता ई लोकार्पण करण्यात आले आहे.नाथजी शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या या एक हजार मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा साठवणूक सुविधांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रतवारी आणि दर्जेदार कांदा पीकाला आंतरराज्य बाजारपेठेत व्यापाराची संधी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या बाजार हस्तक्षेप योजनांचा देखिल लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.या ई लोकार्पण सोहळ्यात झुम च्या आधारे सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा रूपी आपलेमनोगत व्यक्त केले. यावेळी वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी,मान्यवर, अधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच विविध प्रकारच्या कांदा उत्पादक कंपनी यांनी सुद्धा यात सहभाग नोंदवला.
 
केंद्र शासनाच्या नोडल संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या भागीदारीतून बाजार पायाभूत सुविधा साठी साकारलेला हा देशातील अशा पध्दतीचा पहिला प्रकल्प आहे. 


खंडाळा परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार..
 
१ हजार मेट्रिक टन कांदा साठवणूक करणा-या नाथजी शेतकरी उत्पादक संस्थेला नाफेड करिता कांदा खरेदी करण्याची मुभा असल्याने याठिकाणी खंडाळा परिसरातील होतकरु व कष्टकरी जवळपास ३०० जणाना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 

मोठा कांदा साठवणूक प्रकल्प.. 

नाफेड कडून या पुर्वी कांदा साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कांदाचाळ भाडे तत्वावर घेतले जात होते.मात्र कमी क्षमतेच्या ठिकठिकाणी साठवलेल्या कांदा चाळीतील कांदा वाहातूक करण्यासाठी वाहन फे-या मोठया प्रमाणात होत असल्याने मोठया क्षमतेच्या कांदा साठवणूक उभ्या करण्याच्या धोरणातील हा प्रकल्प आहे. 
पहिल्या टप्प्यात सहा केंद्राचे लोकार्पण
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, याच्या हस्ते कांदा साठवणूक व प़णन सुविधा केंद्राचा ई - लोकार्पण सोहळा १ ऑक्टोबर रोजी पाच वाजता करण्यात आले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर सह करमाड अशा दोन प्रकल्पाचे लोकार्पण सुद्धा यावेळी  करण्यात आले आहे.

 दळण वळणासाठी सोयीस्कर...
 
खंडाळा येथे सुरु करण्यात आलेल्या नाफेडच्या महाओनियन कांदा मार्केट डोंगरथडी, तसेच गंगाथडी या दोन भागाच्या मध्यभागी श्रीनाथ प्रोड्युसर कंपनीने स्थापन केले आहे.याठिकाणी दळण वळणासाठी  
वैजापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग, रोटेगाव रेल्वे स्थानक, समृद्धी महामार्ग जवळ असल्याने येथे या प्रकल्पाची उभारणी करण्यात आल्याचे केंद्राचे संचालक उल्हास ठोंबरे यांनी सांगितले. 

१० हजार हेक्टर मध्ये होते कांदा लागवड... 

कापूस, मका या नगदी पीकानंतर येथील शेतकऱ्यांची कांदा पीक लागवडीकडे विशेष लक्ष्य असते.मागील पाच वर्षांत या भागात लाल व उन्हाळ हंगामातील कांदा लागवड १० हजार हेक्टर क्षेत्रात होते. 

केंद्रामुळे कांदा खरेदी स्पर्धा...

कांदा उत्पादक शेतक-यांना कांदा विक्री साठी बाजार समितीचे आजवर एकमेव पर्याय उपलब्ध होता.नाफेडच्या महाओनियन कांदा साठवणूक केंद्रात कांदा खरेदी करण्यात येणार असल्याने स्थानिक व्यापा-यांना आता मनमानी धोरण बाजूला ठेवून स्पर्धात्मक चढाओढीने कांदा खरेदीचे धोरण राबवावे लागेल. 

कांदा उत्पादकांना चांगले व्यासपीठ मिळाले...
उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख
कांदा उत्पादनात अनेक वर्षांपासून सक्रिय असणा-या कुशल कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कांद्याला अंतर राज्यातील बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याची संधी या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभणार असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments